सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) व खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एस.व्ही.आय.टी.) यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिक्षकांच्या गौरवासाठी ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळा स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर-बार्शी रोड, खेड येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास दोन्ही तालुक्यांसह जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उदघाटक म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक व एस.व्ही. आय.टी., सोलापूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. बी. पी. रोंगे हे होते.
दीपप्रज्वलनानंतर प्रमुख पाहुणे इंद्रजित पवार म्हणाले की, 'शिक्षणतज्ञ डॉ. बी. पी. रोंगे सरांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य कौतुकास्पद असून सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा मोठा ठसा आहे. शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना पुरस्कार देणे हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम आहे. या पुरस्कारांमुळे शिक्षकांना पुढील कार्यासाठी निश्चितपणे नवी ऊर्जा व प्रेरणा मिळेल. डॉ. रोंगे सरांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या विकासात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. डॉ. रोंगे सर हे प्रत्येक विषयाच्या खोलात जाऊन त्यावर अभ्यास करून धाडसी निर्णय घेताना उज्वल यश कसे मिळेल याकडे अधिक लक्ष देतात.' असे सांगून डॉ. रोंगे सरांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. डॉ. बी. पी. रोंगे यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून म्हणाले की, 'शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. पुरस्कार मिळालेल्या सर्वांनी यापुढेही आपले कार्य अधिक जोमाने व प्रगतीपथावर सुरू ठेऊन विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे' अशी अपेक्षा व्यक्त केली. या बहारदार कार्यक्रमास जवळपास ६५० शिक्षक सहभागी झाले होते.
यावेळी उत्कृष्ट संस्था, आदर्श महाविद्यालय, आदर्श शाळा, स्वच्छ व सुंदर माझी शाळा, आदर्श प्राचार्य, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी, आदर्श कलाशिक्षक आणि आदर्श क्रीडाशिक्षक अशा विविध विभागातून पुरस्कार प्रदान करण्यात आले. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण ११६ पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे सचिव महादेव कमळे, खजिनदार व्ही. डी. पाटील, संतोष भीमराव पाटील कॉलेज, मंद्रूपचे प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप, श्री. सावित्रीबाई खडतरे कला व विज्ञान महाविद्यालय, पाकणीचे प्राचार्य प्रा. दत्तात्रय शिंदे, लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, मंद्रूपचे प्राचार्य बसप्पा घाटे, सिद्धाराम म्हेत्रे प्रशाला, कुंभारीच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा भांगे, श्री. एस. एस. म्हेत्रे, उर्दू हायस्कूल, कुंभारीच्या मुख्याध्यापिका सौ. शेख एम. एन., जी. बी. घोडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नान्नजचे प्राचार्य रमेश अगलदिवटे तसेच एस.व्ही.आय.टी.चे कॅम्पस इनचार्ज डॉ. कीर्ती भोसले, प्राचार्य डॉ. सुतार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तब्बल चार तास चाललेल्या या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वेरी व एस.व्ही. आय.टी. या दोन्ही संस्थांतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. यादव पनसवाड, प्रा. अरविंद बगले यांच्यासह इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत विशेष मेहनत घेतली. प्रा. यादव पनसवाड यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
१. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, नियुक्ती व सेवा विषयक एकूण ३७ प्रकरणे सोडवली गेली आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्या मुळे शिक्षकांच्या वतीने डॉ. बी. पी. रोंगे सरांचा सत्कार केला.
२. पुरस्कार निवडीपासून कार्यक्रम पत्रिका पोहोचेपर्यंत उत्तम नियोजन 'ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’साठी शिक्षक व विविध पुरस्कारार्थींची निवड करण्यापासून ते त्यांच्या हातात कार्यक्रमाची पत्रिका पोहोचेपर्यंत निवड समितीने अत्यंत कमी वेळेत उत्तम दर्जाचे नियोजन व कार्य केले. पुरस्कारार्थींची माहिती संकलित करणे, निवड प्रक्रिया, संपर्क साधणे आणि कार्यक्रमाचे नियोजन अशा विविध पातळ्यांवर समितीने केलेल्या कार्यामुळे हा भव्य सोहळा यशस्वीपणे पार पडला.

