सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शेतकरी, युवक आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ड्रीम फाउंडेशन संचलित 'श्री. सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्र' आणि ड्रीम युवा बिझनेस फोरम'च्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्राचा शुभारंभ शनिवार, ५ सप्टेंबर रोजी राम रेड्डी यांच्या हस्ते होणार आहे.
सोलापूर पर्यटन जागर अभियानांतर्गत कुमठे शिवारा, मामुरे वस्ती, सोरेगाव तसेच कुमठे रोड आणि विजापूर रोड परिसरात कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले आहे. या केंद्रात फार्म हाऊस, होम स्टे, पारंपरिक खाद्य महोत्सव आणि हर्डा महोत्सव यांसह विविध उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नागरकर, माजी आमदार शिवशरण आण्णा, आमदार सचिन कल्याणशेट्टी, पाटील-बिराजदार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्री प.पू. महांतेश स्वामीजी, तडेवाडी मठ, कर्नाटक यांच्या दिव्य सान्निध्यात कार्यक्रम होणार असून सौ. गजराबाई भतगुणकी आणि गुरुशांत भतगुणकी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कृषी पर्यटन केंद्रात गार्डन, वनराई, आमराई, नारळाचे वन, सेंद्रिय भाजीपाला प्रकल्प, गोशाळा, भाकरी बेक तसेच हर्डा पार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मोठ्या कार्यक्रमांसाठी हॉल व लॉन आणि १२ खोल्यांची स्वतंत्र निवास व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण संस्कृती, योग, मेडिटेशन आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध खाद्यपदार्थांना देशभरात ब्रँडिंग मिळवून देण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.
ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून मागील २९ वर्षांपासून शेतकरी, युवक आणि महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती केंद्राचे संचालक काशिनाथ भतगुणकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटनानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवर मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये वेल्दी लाईफचे संचालक धनंजय पाटील, सौ. सुप्रिया करपे, वेलनेस कोच तुकाराम अशोक टेंगमळे (लातूर), अमोल तळेकर (जालना) आणि किरण पाटील (लातूर) यांचा समावेश आहे.
दरम्यान, रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता 'ड्रीम युवा बिझनेस फोरम'चे उद्घाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पेट्या गहू, राजू राठी आणि सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष केतन शहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मिलिंद भोसले, अमित कामितकर, प्रसाद कानडे आणि दिलीप पंतगे आदी उपस्थित राहणार आहेत. नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन या माध्यमातून मिळणार आहे. ड्रीम युवा बिझनेस फोरमतर्फे दर सोमवारी शेतकऱ्यांसाठी, बुधवारी उद्योजकांसाठी, शुक्रवारी महिलांसाठी आणि रविवारी सर्वांसाठी उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती फोरमचे अध्यक्ष सतीश पाटील आणि संचालिका संगीता भतगुणकी यांनी दिली.
या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक रमेश बिराजदार, बसलिंगप्पा हिप्परगी, परमेश्वर भतगुणकी आणि कल्पना भतगुणकी यांनी केले आहे.


