भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल, भाळवणीच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक राखी जवानांसाठी’ हा अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रेमाने व उत्साहाने तयार केलेल्या १०० हून अधिक राख्या जवानांसाठी पाठविण्यात आल्या.
देशाच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा तसेच रक्षाबंधनाच्या माध्यमातून जवानांशी आपुलकीचे नाते जोडण्याचा हा उपक्रम आहे.
विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे धागे, रिबीन, मणी, मोती व सजावटीच्या साहित्याचा वापर करून सुंदर राख्या तयार केल्या. प्रत्येक राखीमध्ये जवानांप्रती असलेला आदर, प्रेम, कृतज्ञता आणि देशभक्तीची भावना प्रतिबिंबित झाली.
या उपक्रमाच्या वेळी स्कूलचे अध्यक्ष तसेच गुरुकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष सीताराम माने , स्कूलचे कोऑर्डिनेटर अमर शिंदे , स्कूलच्या प्राचार्या तेजश्री निंबाळकर तसेच सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राख्या तयार केल्या.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या मनगटावर विद्यार्थ्यांच्या प्रेमाची राखी पोहोचविण्याचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाच्या नात्याला देशभक्तीची जोड देणारा ठरला.
“एक राखी जवानांसाठी — देशरक्षण करणाऱ्या वीरांना प्रेमाची आणि कृतज्ञतेची मानवंदना!”

