पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट लेवल टेक्निकल फेस्टिवल “स्पेक्ट्रम २के२६”चे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुंडलिक माळी यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. यावेळी बोलताना डॉ. माळी यांनी विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबतच नाविन्यपूर्ण विचार, कौशल्य विकास आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.
सर्व अभियांत्रिकी विभागांमधील विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाअंतर्गत एकूण २० तांत्रिक इव्हेंट्सचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या तांत्रिक कौशल्यांचे प्रदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि मा. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राप्ती खलगे आणि साक्षी हलनवार यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका सोनाली गोडसे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांचे समन्वयक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

