कोर्टी (ता. पंढरपूर) : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संगणक अभियांत्रिकी विभागातील तीन आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील एका विद्यार्थ्याची देशातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनी एलटीआय माइंडट्री मध्ये निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पंढरपूर येथील कु. प्राची प्रशांत डोंगरे, कु. श्रेया महेश सुपेकर, सांगोला येथील कु. सिद्धी विनोद डोईफोडे तसेच मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील सौरभ संजय दिघे यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक ₹४ लाखांचे आकर्षक वेतन पॅकेज मिळाले असून ते लवकरच कंपनीमध्ये रुजू होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
एलटीआय माइंडट्री ही भारतातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा व सल्लागार कंपनी असून २०२२ मध्ये एलअँडटी इन्फोटेक आणि माइंडट्री यांच्या विलीनीकरणातून तिची स्थापना झाली. जगभरातील हजारो ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान सेवा पुरविणाऱ्या या कंपनीमध्ये एक लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उद्योगविश्वासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने प्रथम वर्षापासूनच नियोजनबद्ध प्रशिक्षण दिले जाते. उद्योगांच्या गरजांनुसार तांत्रिक कौशल्ये, प्रोग्रॅमिंग, कम्युनिकेशन स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, अभिक्षमता चाचण्या, गटचर्चा, मॉक इंटरव्ह्यू तसेच करिअर मार्गदर्शन यांवर सातत्याने भर दिला जातो. याशिवाय उद्योगभेटी, तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा आणि विविध कौशल्यविकास कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणासाठी सज्ज केले जाते. याच सर्वांगीण प्रशिक्षणाचा परिणाम म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थी देशातील नामांकित कंपन्यांच्या निवड प्रक्रियेत सातत्याने यश मिळवत आहेत.
विशेष म्हणजे, एलटीआय माइंडट्री ही कंपनी दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात केवळ एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कॅम्पस प्लेसमेंटसाठी भेट देते. चालू शैक्षणिक वर्षात आतापर्यंत २४४ हून अधिक कंपन्यांनी महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित केली आहे. उद्योगांच्या अपेक्षांनुसार आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांची नियोजनबद्ध तयारी करून घेतली जाते. त्यामुळे येथील विद्यार्थी आत्मविश्वासाने मुलाखतींना सामोरे जात उत्कृष्ट यश संपादन करत आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

