“उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला…
नतमस्तक त्या सर्वांना, ज्यांनी भारत देश घडवला…”
“स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण हाच प्रभावी मार्ग; अभ्यासाबरोबर व्यायामालाही महत्त्व द्या” — ॲड. दीपक आर्वे
अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सदाशिवराव माने विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त ॲड. दीपक आर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे, मुख्याध्यापक अमोल फुले, शालेय समित्यांचे सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ॲड. दीपक आर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीताचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. विद्यालयाच्या सयाजीराजे वाद्यवृंदाने सुरेल साथ देत संपूर्ण वातावरण देशभक्तीमय केले.
यानंतर विद्यालयाच्या एनसीसी, आरएसपी आणि स्काऊट पथकांनी बँडपथकाच्या तालासुरात दिमाखदार संचलन सादर केले. संचलनाचे नेतृत्व विद्यार्थी आयुष लोळगे याने केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध व आकर्षक सामुदायिक कवायतींना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार
यावेळी विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करून राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा प्रमुख पाहुणे ॲड. दीपक आर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी
प्रास्ताविकात मुख्याध्यापक अमोल फुले यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्याचे राष्ट्रीय महत्त्व विशद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. निपुण भारत यांसारख्या उपक्रमांमुळे शिक्षणाचा प्रसार आणि गुणवत्ता वृद्धिंगत होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत आज डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत वेगाने प्रगती करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानामुळे शिक्षण, उद्योग, संरक्षण यांसह अनेक क्षेत्रांत मोठे परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यालयाच्या गुणवत्तेचा आढावा घेताना कला,
क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा त्यांनी गौरव केला. नुकत्याच झालेल्या पारंपरिक समूह नृत्य स्पर्धेत विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावत ७१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळविले आहे. तसेच राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघांनी शहरी गटातून प्रथम क्रमांक मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
क्रीडा क्षेत्रात विद्यालयाच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली असून विविध शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस, एनटीएस यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याचेही त्यांनी नमूद केले.
“ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणे हा अविस्मरणीय क्षण” — ॲड. दीपक आर्वे
प्रमुख पाहुणे ॲड. दीपक आर्वे यांनी आपल्या भाषणातून विद्यालयाशी असलेल्या भावनिक नात्याला उजाळा दिला. ते म्हणाले, “ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेच्या स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणे हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिन आहे.”
आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगताना विद्यालयाची गुणवत्तेची वैभवशाली परंपरा पूर्वीपासूनच असून आजही ती कायम असल्याचा माजी विद्यार्थी म्हणून आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदांवर कार्यरत असल्याचे नमूद करत त्यांनी विद्यालयाच्या प्रगतीचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित व मनापासून अभ्यास करण्याबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यायामालाही महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करावेत तसेच मुलांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवावे, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमास रात्र शाळेचे मुख्याध्यापक संजय मुंगसे, पत्रकार, विविध क्षेत्रांतील आजी-माजी पदाधिकारी, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश माने यांनी केले. देशभक्तीपर ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

