मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
रक्षाबंधनाचा पवित्र सण पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत साजरा करण्याच्या उद्देशाने मरोळ पोलीस कॅम्प उ. प्रा.मनपा मराठी अंधेरी पूर्व शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्षसंवर्धनाची शपथ घेत पर्यावरण रक्षणाचा दृढ संकल्प केला.
"झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश देत विद्यार्थिनींनी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे वचन दिले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरणाबद्दलची जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच शाळेतील सर्व सहकारी शिक्षकही कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत रक्षाबंधनाचा सण समाजोपयोगी आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा केला. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक संकल्पाचे स्वागत केले.

