अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड, मैदानी खेळांची गोडी तसेच आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दत्तात्रय वरकड म्हणाले, “अकलूज ही खेळाडूंची खाण असून या भूमीने अनेक नामवंत खेळाडू घडविले आहेत. राष्ट्रीय पातळीवरही येथील खेळाडू अकलूजचे नाव अभिमानाने उज्ज्वल करीत आहेत. ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.” सदाशिवराव माने विद्यालयाचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे असून विद्यालयाने सातत्याने गुणवंत खेळाडू घडविण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
खेळामध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती देताना वरकड यांनी स्पर्धा परीक्षा तसेच प्रशासनातील खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खेळाडूंनी केवळ मैदानावर सराव करण्याबरोबरच आपल्या आहाराकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. सकस व संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैली यामुळे खेळाडूंची शारीरिक व मानसिक क्षमता वाढते, असे त्यांनी सांगितले.
सध्याच्या काळात मोबाईलचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालींवर परिणाम करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून काही काळ दूर राहून अधिकाधिक मैदानी खेळ खेळावेत, खेळाच्या माध्यमातून शरीर सुदृढ ठेवावे आणि संघभावना, शिस्त, चिकाटी व नेतृत्वगुण विकसित करावेत, असे आवाहनही जिल्हा क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर होते. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी संजय राऊत, कल्पना मोरे, क्रीडा शिक्षक उमेश भिंगे, भीमाशंकर पाटील, भीमराव दुधाळ यांच्यासह विद्यालयातील विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणारे खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयातील क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनात उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी सुज्योत पंडित याने क्रीडा दिनविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ हवाले याने तर आभार संजय राऊत यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना क्रीडा, आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश मिळाला.

