सोलापूर प्रतिनिधी राहुल सोनवणे तेज न्यूज
सोलापूरच्या राजकारणात मागील काही निवडणुकांमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते-पाटील असा संघर्ष दिसून आला आहे. आता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोहिते-पाटील यांची बार्गेनिंग पॉवर किती आणि काय असणार, भाजपच्या पॅनेलमध्ये मोहिते-पाटील असणार का?, याच्या उत्तरात डीसीसीच्या निवडणुकीची खरी चुरस दडलेली आहे.
माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची डीसीसीबाबत काय भूमिका असणार, यावर निवडणुकीतील पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहेत. भाजप आणि मोहिते-पाटील यांच्यात समेट झाल्यास नव्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे मोहिते-पाटील गटाची भूमिका सध्या डीसीसीच्या राजकारणातील सर्वांत महत्त्वाचा घटक मानली जात आहे.
माळशिरसची जागा कोणाकडे?
आगामी निवडणुकीत माळशिरस सोसायटी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोण करणार, याबाबतही सहकार क्षेत्रात उत्सुकता आहे. माळशिरस तालुक्यातील सोसायट्यांच्या राजकारणात मोहिते-पाटील यांचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील १४५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांपैकी १४१ संस्था मतदानासाठी पात्र असून, त्यातील सुमारे १०० संस्था मोहिते-पाटील यांच्या प्रभावाखाली असल्याचे वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे माळशिरस सोसायटी मतदारसंघातून डीसीसीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा डीसीसीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी विविध मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे माळशिरसच्या जागेवर त्यांची संभाव्य उमेदवारी ही निवडणुकीतील महत्त्वाची घडामोड ठरू शकते.
तीन जागांवर निर्णायक ताकद
माळशिरसपुरतीच मोहिते-पाटील यांची ताकद मर्यादित नसून, डीसीसीच्या शेतमाल प्रक्रिया संस्था आणि दुग्ध संस्था या दोन मतदारसंघांतही त्यांच्याकडे निर्णायक संख्याबळ असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दोन जागांसह माळशिरस सोसायटी मतदारसंघ अशा तीन जागांवर मोहिते-पाटील गटाचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे.
डीसीसीच्या संचालक मंडळात सोसायटी मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यातून एक अशा ११ जागा, तर इतर विविध मतदारसंघांतून आठ संचालक निवडले जातात. त्यामुळे एखाद्या गटाकडे विशिष्ट मतदारसंघांमध्ये असलेले संख्याबळ संपूर्ण पॅनेलच्या समीकरणांवर परिणाम करू शकते.
भाजपसाठी मोहिते-पाटील महत्त्वाचे?
डीसीसी बँकेच्या निवडणुकीत भाजपकडे जिल्ह्यातील अनेक प्रभावी सहकार नेते असल्याने भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, माळशिरससह काही मतदारसंघांमध्ये मोहिते-पाटील यांचे असलेले संघटन आणि संस्थात्मक संख्याबळ भाजपसाठीही दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे मोहिते-पाटील यांना सोबत घेऊन निवडणूक लढवायची की स्वतंत्रपणे ताकद आजमावायची, हा भाजपसमोरील महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो.
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी पाहता, डीसीसीची निवडणूक सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणातील शक्तिप्रदर्शन ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहिते-पाटील गटाची भूमिका, माळशिरसची उमेदवारी आणि भाजपसोबतचे संभाव्य समीकरण यावरच डीसीसीच्या निवडणुकीची खरी चुरस किती रंगणार, हे स्पष्ट होणार आहे.

.jpg)