पंढरपूर प्रतिनिधी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलेले विश्वविक्रमवीर कवी, सृजनशील लेखक रवि वसंत सोनार व सौ. सविता रवि सोनार या आदर्श सखा-सखीच्या समाजसेवा, शिक्षण, पर्यावरण, साहित्य, संस्कृती, कला, अध्यात्म, अभिनय, लघुपट निर्मिती या व अशा विविध क्षेत्रातील सर्वंकष कार्याची दखल घेऊन 'बहुजन साहित्य संघ, चिखली' च्या माध्यमातून उभयतांना सातवे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या विचारपीठावर संमेलनाचे अध्यक्ष मा. नागेशजी सिंघन, डॉ. एम. आर. टकले, डॉ. एम. ए. गायकवाड, बहुजन साहित्य संघाचे सर्वेसर्वा ॲड. मा. विजयकुमार कस्तुरे, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष मा. आशा खडतरे, ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रा. किसनराव कुराडे, उद्योजक मा. राजाराम येवले, डॉ. व्ही. डी. खरात, डॉ. बबनराव महामुने या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते पुस्तक संच, पुष्पगुच्छ, महावस्त्र, सन्मानचिन्ह, मानाची पैठणी आणि मानपत्र देऊन 'फुले - शाहू - आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पती-पत्नी पुरस्कार २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री. व सौ. सोनार हे समाजसेवा, शिक्षण, पर्यावरण, साहित्य, संस्कृती, कला आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असणारे आदर्श दाम्पत्य म्हणून ओळखले जातात. निःस्वार्थ सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक परिवर्तनाची जाणीव या मूल्यांवर आधारित त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मातोश्री वृद्धाश्रम, रामकृष्णहरी वृद्धाश्रम, नवरंगे बालकाश्रम, अंधशाळा, पालवी सामाजिक संस्था यांना त्यांनी गरजेनुसार मदत केली. कार्य करत असताना सोनार पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा कायम राखला आहे. खरं तर आज समाजात नात्यांची वीण सैल होत आहे. विवाह आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत आहे. विभक्त पती-पत्नीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि ही समाजासाठी तशी खेदाची बाब आहे. परंतु सोनार पती-पत्नीतील प्रेम आणि विश्वास सव्वीस वर्षांत तसुभरही कमी होऊ दिला नाही. उलट त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, अध्यात्मिक अशा सेवा कार्यातून एकमेकांना साथ देत आपल्या लग्नाचा रौप्यमहोत्सव साजरा केला. छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद कसा घ्यावा याचे उत्तम उदाहरण सोनार दांपत्यांनी निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्सव म्हणून साजरा केला आहे. त्याबरोबरच त्यांचे मित्र, स्नेही, नातेवाईक, इतकेच नाही तर समाजातील उपेक्षित व गरजवंत घटकांना देखील आपल्या प्रत्येक आनंदात सहभागी करून घेतले आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श जोडपे म्हणून आदर्श निर्माण केला आहे.
कौटुंबिक जबाबदारी पार पाडत नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कवी रवि वसंत सोनार आणि सौ. सविता रवि सोनार यांना 'फुले - शाहू - आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पती-पत्नी पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात आल्यामुळे पंढरपूर आणि परिसरातील साहित्य, नाट्य, संगीत, आरोग्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, अध्यात्मिक, पत्रकारिता, विधिज्ञ, उद्योग, शैक्षणिक, चित्रपट या व इतर क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
पंढरपूर येथे पार पडलेल्या सातव्या बहुजन साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रभरातील मराठी कवी, कवयित्री, साहित्यिक, व्याख्याते, प्रकाशक आणि साहित्यप्रेमी यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी ग्रंथदिंडी रांगोळी प्रदर्शन पुस्तक प्रदर्शन, पुरस्कार वितरण, कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन व इतरही सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी बहुजन साहित्य संघाच्या राज्यभरातील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

