पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील उमा महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला असून, महाविद्यालयात B.Sc. (Entire Computer Science – ECS) हा नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या उमा महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून सुरू होणार आहे.
या मान्यतेमुळे पंढरपूर व परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, प्रोग्रामिंग, डिजिटल तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर विकास आणि कौशल्याधारित शिक्षणाचा समावेश असलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
संस्थेचे विश्वस्त माजी प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांनी या मान्यतेबद्दल सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व तंत्रज्ञानाधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असून, नवीन B.Sc. (ECS) अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होतील.
महाविद्यालयाचे प्राचार्य धीरजकुमार बाड यांनी सांगितले की, या अभ्यासक्रमासाठी आवश्यक अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक सुविधा आणि अनुभवी प्राध्यापकांची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या मान्यतेमुळे उमा महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळाली असून, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित उमा महाविद्यालयाशी संपर्क साधावा.


