भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
वार शनिवार दिनांक - १८ जुलै २०२६ रोजी वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशाला येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी 'बालदिंडी' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम.पी.पी.काळे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे आणि पालखीचे पूजन करून दिंडीला सुरूवात झाली.
या सोहळ्यामध्ये बालचमूंनी घेतलेला वारकरी वेष आणि "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" च्या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला.
यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ-मृदंग आणि खांद्यावर भगव्या पताका घेतल्या होत्या.मुलांनी पांढरा कुर्ता-धोती तर मुलींनी नऊवारी साडी परिधान केली होती.
यानंतर ह्या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान सह.शि.वसंतराव काळे सह.साखर कारखाना स्थळी असणारे विठ्ठल रखुमाई मंदिर येथे टाळ जयघोषाच्या गजरात दाखल झाला.
या वेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रिंगण तयार करून यामध्ये विद्यार्थ्यांनी विठू माऊलीच्या चरणी फुगड्या आणि पारंपरिक नृत्ये सादर केली.सदर बालदिंडी सोहळा विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करत संपन्न करण्यात आला.
पालखीची आणि बालदिंडीची प्रशालेपासून सर्व परिसरामधून मिरवणूक काढण्यात आली.या वेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती.
सदर बालदिंडीचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक एस एल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख शिक्षिका पी पी काळे यांनी प्रशालेतील सर्व सहशिक्षक व सहशिक्षिका यांच्या सहकार्याने केले होते.

