सुस्ते प्रतिनिधी श्रीकांत चंदनशिवे तेज न्यूज
पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्ष संवर्धनासाठी शासनाने हाती घेतलेल्या उपक्रमांतर्गत तसेच सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे मा. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या आदेशान्वये श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेमध्ये आज "सीड बॉल" अर्थात 'बीज चेंडू ' बनवण्याचे प्रात्यक्षिक मोठ्या उत्साहात पार पडले.
हे प्रात्यक्षिक प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक, कलाध्यापक श्रीकांत चंदनशिवे व सहशिक्षक प्रथमेश गावडे यांनी विद्यार्थ्यांना करुन दाखविले व मार्गदर्शन केले. तीन भाग माती, व एक भाग शेण आणि विविध वृक्षांच्या बिया एकत्र करून सीड बॉल कसे बनवायचे याचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवून दिल्याने विद्यार्थी उत्साहात सीडबॉल बनवण्यासाठी प्रेरित झाले.
या आषाढी वारी 2026 मध्ये वारकऱ्यांच्या माध्यमातून हे सीड बॉल संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवले जाणार आहेत. वारकरी वाटेत,मोकळ्या जागी हे बीज चेंडू टाकतील. पावसाळ्यात त्यातून रोपे उगवून वृक्षांची निर्मिती होणार आहे.
या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शेकडो सीड बॉल तयार केले. विद्यार्थ्यांनी 5000 पेक्षा जास्त सीडबॉल बनवण्याचे अभिवचन दिले.
यावेळी प्राचार्य कटकधोंड म्हणाले की, "हा केवळ उपक्रम नसून पर्यावरणाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रत्येक सीड बॉल हे भविष्यातील एक वृक्ष आहे.अशा उप्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जाणीव आणि जागृती विकसित होईल."
कलाध्यापक चंदनशिवे म्हणाले की, शिक्षणाधिकारी जगताप साहेब यांनी पंढरपूर आषाढी यात्रा 2026 मध्ये दहा लाख सीडबॉल वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रशालेने 5000 सिडबॉल बनवण्याचा व वारीमध्ये ते वितरित करण्याचा संकल्प केला आहे. परतीच्या प्रवासात हे सिडबॉल वारकरी त्यांना हव्या त्या ठिकाणी टाकतील व त्यातून रोप अंकुरित होऊन नंतर वृक्षाची निर्मिती होईल. सीडबॉल उपक्रमामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वृक्ष लागवडीस चालना मिळेल व खऱ्या अर्थाने निसर्गाचे संवर्धन होईल.
"हरी मुखे म्हणा,वृक्ष लावू पुन्हा पुन्हा", "वारीची वाट, हिरवाई घनदाट" आणि "साथी हाथ बढ़ाना, धरती माँ को है बचाना" जगह जगह है पेड लगाना, इसीलिए तो सीडबॉल है बनाना।" या स्वरचित घोषणांनी परिसर दणाणून गेला.
प्रशालेच्या या पर्यावरण संवर्धन उपक्रमाबद्दल पालक, ग्रामस्थ व संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, ॲड.वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, ज्येष्ठ संचालक दिलीप घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल, विजयकुमार माळवदकर, मुकुंद गिरी, सुनिता मोरे आदींनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी पर्यवेक्षक सुरेश कट्टे, वरिष्ठ लिपिक राजकुमार ढगे, जेष्ठ शिक्षक राजेंद्र जाधव, जैनुद्दीन शेख,नागनाथ मैंदर्गी,अमोल हुंगे, ज्युनिअर विभाग प्रमुख राजाराम घोडके, गजानन गायकवाड व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

