मुंबई प्रतिनिधी प्रमोद सूर्यवंशी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना देय असलेला घरभाडे भत्ता (HRA) अद्याप पूर्णपणे अदा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीतील मुंबई महानगर क्षेत्रासाठी लागू असलेला ३ टक्के वाढीव घरभाडे भत्ता गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.
महागाई सातत्याने वाढत असताना घरभाडे भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याचा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, शासनाकडे वारंवार निवेदने, पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करूनही या प्रलंबित भत्त्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये असंतोष वाढत आहे.
कर्मचारी प्रतिनिधींच्या मते, संबंधित शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील थकीत ३ टक्के घरभाडे भत्ता तातडीने अदा करणे आवश्यक आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी या प्रश्नाकडे शासनाचे वारंवार लक्ष वेधले असले, तरी अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही.
राज्य शासनाने तसेच वित्त विभाग आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन प्रलंबित घरभाडे भत्त्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि विविध कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही रक्कम लवकरात लवकर वितरित झाल्यास हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

