पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते आरोग्यमंत्री आबिटकर यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आयुक्त संजय काटकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय सरडे, आरोग्य अधिकारी डॉ. महेश सुडके यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
वाखरी पालखी तळाची आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी
आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह सर्व संतांचे पालखी सोहळे वाखरी येथे मुक्कामी दाखल होतात. येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांसाठी आषाढी प्रशासनाच्या वतीने वाखरी पालखी तळावर उपलब्ध करण्यात आलेल्या व देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली.
यावेळी त्यांनी वाखरी पालखी तळाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. तळावर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच महिला वारकरी भाविकांसाठी आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा याबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना त्यांनी केल्या.
याप्रसंगी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आयुक्त संजय काटकर, राज्य आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय सरडे, आरोग्य अधिकारी डॉ. महेश सुडके आदी उपस्थित होते.


