नातेपुते प्रतिनिधी तेज न्यूज
संत परंपरेचा अखंड वारसा जपत लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत धर्मपुरी (ता. माळशिरस) येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पालखीचे सोलापूर जिल्ह्यात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
"विठ्ठल... विठ्ठल..." आणि "माऊली... माऊली..." या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाचा गजर, अभंगांचा मधुर निनाद, भगव्या पताकांची उधळण आणि भक्तिभावाने नाचणारे वारकरी यामुळे अवघे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.
पालखी आगमनावेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी फुलांची उधळण करत माऊलींचे मनोभावे स्वागत केले. विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार, आरोग्य सेवा तसेच इतर आवश्यक सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. स्वागत कमानी, आकर्षक रांगोळ्या आणि सुंदर सजावटीमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता. हरिनामाचा अखंड गजर, अभंग आणि भजनांच्या स्वरांनी भक्तीचा अविस्मरणीय सोहळा अनुभवायला मिळाला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा केवळ धार्मिक परंपरा नसून श्रद्धा, सेवा, समता आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश देणारा लोकोत्सव असल्याचे यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,सातारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे,उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह मराठी चित्रपट अभिनेते भाऊ कदम, सोलापूर जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक उपस्थित होते.

