पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी शुध्द एकादशी दि.25 जुलै 2026 रोजी असून, यात्रा कालवधी 15 ते 29 जुलै असा आहे. या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी 18 ते 20 लाख भाविक पंढरपूरात येतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान पवित्र स्नान मानले जाते. चंद्रभागा स्नानासाठी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. तसेच येणारे भाविक चंद्रभागा नदी पात्रातून विष्णूपद, इस्कॉन मंदीर येथे नौका विहार करतात. या कालावधीत कोणतीही अनुचित घडना घडू नये तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी होडी चालक, मालकांनी आसनक्षमतेपेक्षा जास्त जलप्रवासी वाहतुक करु नये यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आदेश पारीत केला आहे .
होडी चालक, मालकांनी वारी कालावधी अगोदर आपल्या होडींची दुरुस्ती करुन घ्यावी व वेळोवेळी देखभाल करावी.योग्य आसन क्षमता प्रवासी व चालक, मालकसहित निश्चित करावी. जलप्रवासी वाहतुकीचे वेळापत्रक निश्चित करावे, सूर्योदयापूर्वी व सुर्यास्तानंतर होडीतून प्रवासी वाहतुक करू नये. जलवाहतूकीदरम्यान सुरक्षेच्या साधनांचा प्रवाशी व चालक यांनी अनिवार्यपणे वापर करण्यास तसेच नियमित करून दिलेल्या वेळेत जलवाहतूक करावी. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आदेश सदर पारीत केला आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

