पंढरपूर आषाढी वारी प्रतिनिधी स्वागत खपाले
"पावलो पंढरी पार नाही सुखा..." अशा भक्तीमय रंगात न्हाऊन निघत, मराठवाड्यातील प्रती पंढरपूर अशी ओळख असलेल्या जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र अनवा येथील संत सद्गुरू श्री विठोबादादामहाराज चातुर्मास्ये संस्थानची मानाची पायी दिंडी मंगळवारी (२१ जुलै) सायंकाळी दगडी पुलावरून भुवैकुंठ पंढरीत दाखल झाली. टाळ-मृदंगाचा गजर, श्रीविठ्ठल नामाचा जयघोष आणि वारकऱ्यांच्या अभूतपूर्व उत्साहात या दिंडीचे पंढरपूर नगरीत स्वागत करण्यात आले.
भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र अनवा येथून ३० जून २०२६ रोजी या मानाच्या दिंडीने पंढरीकडे प्रस्थान केले होते. दिंडी सोहळा प्रमुख ह.भ.प. श्री कैवल्य महाराज चातुर्मास्ये यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या दिंडीने अनवा – सिल्लोड – छत्रपती संभाजीनगर – श्रीक्षेत्र पैठण मार्गे पारगाव घुमरा – श्रीक्षेत्र लहूळ – लोणी – आष्टी – रोपळे असा सुमारे ४५० किलोमीटरचा टप्पा पार केला. २२ दिवसांच्या या प्रवासात दिंडीने ६ जिल्ह्यांतून यशस्वी मार्गक्रमण केले.
भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या प्रत्यक्ष आदेशाने सुरू झालेली श्री चातुर्मास्ये महाराजांची नित्य चातुर्मास कीर्तनसेवेची ही विशिष्ट परंपरा आहे. गेल्या त्रिशतकापासून (सुमारे ३०० वर्षांपासून) ही परंपरा अविरत आणि अबाधित सुरू आहे. संस्थानचे १५ वे विद्यमान पीठाधिश प.पू. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज चातुर्मास्ये ही परंपरा अत्यंत श्रद्धेने, निष्ठेने आणि विनाखंड सांभाळत आहेत.
दत्त घाटावरील मठात 4 महिने अध्यात्मिक सोहळा(चौकट)
दिंडी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर आता पुढील चार महिने म्हणजेच चातुर्मास काळात चंद्रभागेच्या तीरावरील 'दत्त घाटावरील मठात' धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये नित्य काकडा भजन, श्रीमद् भागवत कथा, श्री गाथा भजन, हरिपाठ आणि दररोज सायंकाळी विद्यमान पीठाधिश महाराजांचे हरीकीर्तन असे कार्यक्रमाचा भाविकांना लाभ घेता येणार आहे.दिंडी पंढरीत सुखरूप दाखल झाल्याने सर्व वारकरी आणि भाविक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

