पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने वाडीकुरोली येथे आषाढी वारीतील वारकरी भाविकांसाठी २५ हजार भाकरींच्या अन्नदानाचा भव्य उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांच्या संकल्पनेतून व नियोजनातून झालेल्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अजितदादांच्या जयंतीनिमित्त समाजसेवेचा आदर्श घालणारा हा स्तुत्य उपक्रम असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
आळंदी व देहूहून पायी पंढरपूरकडे निघालेल्या वारकरी भाविकांना सोलापुरी भाकरी, झुणका, ठेचा, दही व चटणीचे प्रेमपूर्वक वाटप करण्यात आले. हजारो वारकऱ्यांनी या अन्नदानाचा लाभ घेत आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या अन्नदान उपक्रमाचा शुभारंभ श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब कौलगे तसेच युवा गर्जनेचे संस्थापक अध्यक्ष समाधानदादा काळे यांच्या शुभहस्ते झाला.
यावेळी यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, सहकार शिरोमणीचे संचालक शंकर चव्हाण, अरुण भुई ,अमोल माने, नारायण शिंदे, नानासाहेब काळे, प्राचार्य एस. आर. कुलकर्णी, पर्यवेक्षक के. ए. गाजरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाच्या माध्यमातून वारकरी सेवेचा संदेश देणारा कल्याणराव काळे यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय ठरत असून, उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक केले.

