मुंबई, जोगेश्वरी (पूर्व) गणेश हिरवे तेज न्यूज
अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालय, जोगेश्वरी (पूर्व) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रभागाच्या नगरसेविका ममता यादव, अस्मिता संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर पारखी, जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या पीएसआय दिपाली घोगरे, शबाना सय्यद, पालक व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पूर्वप्राथमिक विभागाच्या क्षमा मोंडकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका पवार आणि संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर पारखी यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत केले.
यावेळी नवीन शैक्षणिक वर्षातील पाठ्यपुस्तकांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेत सर्वप्रथम उपस्थित राहिलेल्या प्रत्येक इयत्तेतील दोन विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पाठ्यपुस्तके व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रभावी पथनाट्य तसेच “नमस्ते सदा वत्सले” या प्रार्थनेवर सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका पवार यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यास, संस्कार आणि सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते मिकी माऊसच्या वेशातील मनोरंजनात्मक सादरीकरण. विविध शैक्षणिक गीतांवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी एकत्रित नृत्य करून आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तके, दैनंदिनी, विद्यार्थी ओळखपत्र तसेच भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. तसेच मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांसाठी गोड शिऱ्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
शाळेतील विविध कार्यक्रमांचे नेहमी उत्कृष्ट छायाचित्रण करणारे बाळकृष्ण मोंडे तसेच शाळेचे माजी विद्यार्थी कु. आयुष जंगम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तके आणि गोड खाऊचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अस्मिता परिवारातील सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाची सांगता “स्वर्गात आकाशगंगा” या गीतावर सर्व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक सामूहिक नृत्याने झाली. प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे आनंदी, उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात स्वागत करण्यात आले.


