मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
बोरीवली : अभिनव शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यामंदिर माध्यमिक, बोरीवली येथे आदिवासी पाड्यातून शाळेत येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम नुकताच राबविण्यात आला. Canara Robeco Asset Management Company Limited आणि Hidush Foundation यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
आदिवासी पाड्यातील अनेक विद्यार्थी शाळेत येण्यासाठी दररोज लांबचा प्रवास करतात. त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडचणी कमी व्हाव्यात, शाळेत ये-जा करणे सुलभ व्हावे आणि शिक्षणाची गती वाढावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षिका तेजस्वी अनिल निवाते यांनी पुढाकार घेत विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी संबंधित संस्थांशी संपर्क साधत सायकल वाटपासाठी प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकाराला Canara Robeco Asset Management Company Limited आणि Hidush Foundation यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून दिल्या.
सायकल मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसून आला. शाळेत नियमित उपस्थित राहण्यास तसेच शिक्षणाकडे अधिक उत्साहाने पाहण्यास या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देणारा आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे,” अशी भावना शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांनी एकत्रितपणे केलेला हा प्रयत्न शिक्षणाच्या क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

