भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी (ता. पंढरपूर) : प्रेमसंबंधातून झालेल्या वादामुळे मानसिक तणावात असलेल्या एका महिलेने गुरुवारी भाळवणी येथील मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिस प्रशासन व संबंधित यंत्रणेला तात्काळ कळविण्यात आले. बराच वेळ समजूत काढल्यानंतर महिलेने टॉवरवरून खाली येण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्राथमिक माहितीनुसार, प्रेमसंबंधात निर्माण झालेल्या तणावामुळे महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे काही काळ भाळवणी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पोलीस अधिकारी रेखा घनवट यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.


