अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. टी. आर. माने यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सन्मान सोहळा तसेच त्यांच्या ‘दुष्काळातून वाटचाल एका स्वप्नाची’ या आत्मकथनाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम अकलूज येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास शिक्षण, साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. टी. आर. माने हे दिनांक ३१ मे २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला गौरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्यांच्या आत्मकथनाच्या प्रकाशन व लोकार्पण सोहळ्याचाही समावेश करण्यात आला. या आत्मकथनाचे प्रारंभी प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास (माजी मराठी विभागप्रमुख, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी) यांच्या हस्ते संपन्न झाले होते. तर या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा अकलूज येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुतेचे माजी प्राचार्य डॉ. सी. बी. कोळेकर यांच्या हस्ते पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशक ‘मार्मिक संवाद प्रकाशन’, पंढरपूरचे रवी वसंत सोनार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सी. बी. कोळेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, कवी, लेखक व गीतकार प्रा. दादासाहेब खरात (माजी प्राचार्य, वसंतराव काळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडीकुरोली) उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना प्रा. रामलिंग सावळजकर यांनी डॉ. माने यांच्या विद्यार्थी जीवनापासूनच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून त्यांनी प्राध्यापक आणि विभागप्रमुख पदापर्यंत मजल मारली, ही बाब विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. माने हे आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे सांगताना त्यांनी त्यांच्या जिद्द, चिकाटी व सर्व शिक्षकांशी असलेल्या स्नेहसंबंधांचा उल्लेख केला.
आत्मकथनाचे परीक्षण करताना प्रा. दादासाहेब खरात म्हणाले की, या ग्रंथात लेखकाने जीवनातील घटना कोणतीही अतिशयोक्ती न करता वास्तव स्वरूपात मांडल्या आहेत. संघर्ष, परिश्रम, अपयश आणि त्यावर मात करून साधलेले यश यांचे अत्यंत प्रभावी चित्रण या आत्मकथनामध्ये आढळते. हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचे आत्मकथन नसून ग्रामीण भागातील अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी जीवनदर्शन आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. माने यांचे वर्गमित्र नंदकुमार मांडवे आणि महेश देशपांडे यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या मेहनती व अभ्यासू स्वभावाच्या अनेक आठवणी सांगितल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. टी. आर. माने यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवास कथन केला. अनेक वेळा अपयश आले, आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागले; मात्र चिकाटी, परिश्रम आणि शिक्षणावरील विश्वास यांच्या बळावर यश संपादन करता आले, असे त्यांनी सांगितले. ‘दुष्काळातून वाटचाल एका स्वप्नाची’ हे आत्मकथन केवळ वैयक्तिक जीवनकथा नसून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वप्ने साकार करण्याचा प्रेरणादायी प्रवास असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. सी. बी. कोळेकर यांनी डॉ. माने यांच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव केला. अत्यंत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी ते महाविद्यालयीन विभागप्रमुख असा त्यांचा प्रवास अभिमानास्पद असल्याचे सांगून सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि सर्जनशील जावो, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास डॉ. बी. आर. कर्चे व सौ. कर्चे, प्रा. आर. एच. कुंभार, विद्यमान भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पवार व सौ. पवार, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. भारत गायकवाड, लेखक व समीक्षक प्रा. शिवाजी धोंडीबा वाघमारे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. पांडुरंग नलवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आत्मकथनाच्या मलपृष्ठासाठी ‘कष्टातून घडलेले आयुष्य’ हा लेख लिहिणारे प्रा. शिवाजी वाघमारे यांनीही पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. माने यांचे वर्गमित्र सतीश राऊत, भारत बनकर, दत्तू बनकर, नागनाथ भाकरे, दशरथ माने, नीलकंठ माने देशमुख, राजू खराडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समर्पक सूत्रसंचालन उरवणे गुरुजी (माळेवाडी, अकलूज) यांनी केले. उपस्थितांचे आभारही त्यांनीच मानले.


