करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब,तालुका पंढरपूर जि. सोलापूर येथे गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यास, खा. धैर्यशील मोहिते पाटील ,माजी खासदार राजु शेट्टी,आ.सतेज पाटील करकंब,येथे उपस्थित होते.
शेती म्हणजे आमची केवळ जमीन नाही…शेती म्हणजे आमची पिढीजात ओळख, आमची पोटाची भाकरी आणि आमचे जीवन आहे. १९७२ च्या दुष्काळात सुकडीची भाकर खाऊनही इथल्या शेतकऱ्यांनी जमिनी टिकवल्या, पण विकल्या नाहीत. आज त्या जमिनी केवळ आनावश्यक असलेल्या प्रकल्पासाठी हिरावून घेण्याचा प्रयत्न का? ऊस, द्राक्षे, डाळिंब, केळी उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या बागा उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.
आज रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आहे. सांगली ते सोलापूर दरम्यान दररोज सुमारे २० हजार वाहने या मार्गावरून प्रवास करतात. हा महामार्ग पूर्ण क्षमतेच्या फक्त 25 ते 30 टक्के चालतोय.. जिल्ह्यातील या महामार्गावरील टोलनाक्यावर ४० लाख टोल महसूलचे अपेक्षित असताना दररोज अंदाजे १२ लाख रुपयांचा टोल महसूल जमा होतो.भविष्यात सुधारणा केल्यास या मार्गावरील वाहतूक आणखी वाढू शकते.
मग प्रश्न असा आहे की,अस्तित्वात असलेला महामार्ग सक्षम करण्याऐवजी समांतर नवीन महामार्गाची गरज नेमकी कोणासाठी?आजचा रत्नागिरी नागपूर महामार्ग अनेक ठिकाणी सहापदरी आणि आठपदरी करण्यासाठी जमीन उपलब्ध असताना, त्याच मार्गाचा विस्तार का करू नये?
शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली सह्याद्री परिसरातील, गडचिरोली भागातील नैसर्गिक साधनसंपत्ती, गौणखनिज उत्खनन होणार आहे.शक्तीपीठ महामार्ग कोणाच्या हितासाठी राबवला जात आहे?विकासाच्या नावाखाली निसर्ग आणि शेतकरी यांचा बळी देणे योग्य नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या तीव्र विरोध लक्षात घेऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा.
यावेळी जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख,के. के. पाटील,गिरीश फोंडे, प्रकाश पाटील, भारत शिंदे, दत्ता मगर, बाळासो पाटील, शिवाजी पाटील,दीपक देशमुख, विनंती कुलकर्णी, शरद पांढरे, सचिन जगताप, मारुती चव्हाण, संदीप पाटील, युवक काँग्रेसचे नितीन शिंदे, महेश व्यवहारे, सचिन हराळे, अभिजीत हराळे, बाळू अण्णा व्यवहारे, राजकुमार हराळे, रंजीत व्यवहारे, यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी, विविध संघटनांचे आणि शक्तीपीठ महामार्ग विऱोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


