अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
"साधेपणा, संस्कार, त्याग आणि समाजसेवेच्या अखंड व्रताने असंख्यांच्या जीवनात प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील (आक्कासाहेब)," अशा भावपूर्ण शब्दांत त्यांच्या कार्याला अभिवादन करत सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे त्यांच्या २४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत श्रद्धापूर्वक आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांच्या शुभहस्ते स्व. आक्कासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रात्र प्रशाला, अकलूजचे मुख्याध्यापक संजय मुंगसे सर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी बलभीम काकुळे, संजय राऊत तसेच शिक्षकेत्तर प्रतिनिधी नवनाथ बळवंतराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते विद्यालयाच्या 'सयाजीराजे वाद्य वृंदा'ने आक्कासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेले भावस्पर्शी 'रत्नाई गीत' या गीताने उपस्थितांच्या मनात त्यांच्या कार्याविषयी अभिमान आणि कृतज्ञतेची भावना जागृत केली.
यावेळी विद्यार्थिनी कु. अंकिता पताळे हिने आपल्या प्रभावी भाषणातून आक्कासाहेबांच्या जीवनप्रवासाचा, त्यागमय कार्याचा, समाजहितासाठी केलेल्या योगदानाचा आणि त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा प्रभावी कार्यपट उलगडून सांगितला. तिच्या मनोगताला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
शिक्षक मनोगतातून सहशिक्षक कृष्णा सरवदे यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वातून विविध काव्यपंक्ती, अलंकार आणि संदर्भांचा समर्पक वापर करत आक्कासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांच्या बालपणापासूनची धार्मिक वृत्ती, संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व, गोरगरीबांविषयीची कृतज्ञता, त्यागी स्वभाव, समाजकारणातील योगदान तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कार्यात त्यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याचा त्यांनी प्रभावी आढावा घेतला. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना समाजसेवा, संस्कार आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श समोर ठेवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका तृप्ती मार्डीकर यांनी नेटके व प्रभावीपणे केले. तर आभार प्रदर्शन प्रतिभा राजगुरू यांनी मानले.
या प्रेरणादायी कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आक्कासाहेबांच्या जीवनातील मूल्यांचा वारसा जपत समाजाभिमुख कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली.


