सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
सातारा दि. “नव नवीन तंत्रज्ञानामुळे जग बदलत आहे वेगवेगळे विचार आणि संकल्पना जागतिक पातळीवर रूढ होत असताना या सर्व संकल्पनांना समांतर शैक्षणिक व्यवस्था उभी करण्याचे काम रयत शिक्षण संस्थेच्या वतीने केले जात आहे. जगातील नामवंत विद्यापीठांशी समन्वय साधून रयतच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्मवीर अण्णांचा त्याग आणि दूरदृष्टी घेऊन संस्थेचा विस्तार अधिक व्यापकपणे सुरु आहे. आज रयतशिक्षण संस्थेची जी उंची वाढली याचे श्रेय रयत शिक्षण संस्थेतील सेवकांना जाते”, असे प्रतिपादन रयत शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरद पवार यांनी केले.
सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या वेळी खा. सुप्रियाताई सुळे, आ.दिलीप वळसे-पाटील, व्हा.चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, रामशेठ ठाकूर, मीनाताई जगधने, जयश्रीताई चौगुले,सरोज पाटील (माई), महेंद्र लाड, अॅड.रवींद्र पवार, आ. डॉ.विश्वजित कदम आ.शशिकांत शिंदे, खा. धैर्येशील मोहिते,आ. रोहित पवार, आ. अभिजित पाटील,आ. परेश ठाकूर, आ.चेतन तुपे, आ. आशुतोष काळे, आ. बाळासाहेब पाटील, अॅड.दिलावर मुल्ला, जे.के. बापू जाधव, थोर देणगीदार शकुंतला ठाकूर, कर्मवीर कुटुंबीय, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, कर्मवीर अण्णांनी अतिशय कष्टाने, त्यागाने आणि दूरदृष्टी ठेवून शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे दरवाजे खुले व्हावेत, म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
हाच त्यांचा आदर्श आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. 742 शाखा असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत झाला आहे. सव्वा चार लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. थोर देणगीदारामुळे ऊर्जा वाढते, संस्थेला अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यापुढे ही शैक्षणिक धोरणात्मक बदल करून निर्णय घेतले जात आहेत. जगभरातील नामवंत विद्यापीठाशी समन्वय साधून रयत शिक्षण संस्था प्रगती करणार असून सर्वांनी त्यास साथ द्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मान्यवरांचे हस्ते रयत मासिक, रयत विज्ञान पत्रिका, ॲड. बी.एन.नलावडे याच्या कर्मवीरांचा सांगाती आत्मचरित्राचे, शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा आदींचे प्रकाशन करण्यात आले.
थोर देणगीदार, कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखा, यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,रयत मासिकाचे कार्यकारी संपादक डॉ.सुधीर भोंगळे इत्यादींचा यावेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कार वितरणाचे निवेदन उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव बी.एन.पवार यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंम्बर, लाईफ वर्कर, शाखांचे शाखाप्रमुख,प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



