संग्रामनगर प्रतिनिधी तेज न्यूज
अकलूजमधील नामांकित राणे हॉस्पिटलमधील ओ.पी.डी. कॅबिनमधून चोरलेले चेकबुक वापर करून तब्बल ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात आणि बँक व्यवहारांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्रचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ.रेवती नितीन राणे (वय ४२,रा. बायपास रोड,अकलूज) यांचे अकलूज येथे राणे हॉस्पिटल आहे. ऑक्टोबर २०२५ च्या सुमारास त्यांच्या हॉस्पिटलमधील ओ.पी.डी. कॅबिनच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 'ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनाकॉलॉजी सोसायटी'च्या बँक ऑफ बडोदा शाखेचे चेकबुक चोरीला गेले होते.सुरुवातीला या चोरीकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही मात्र त्यानंतर घडलेल्या प्रकाराने डॉक्टर राणे यांना धक्काच बसला.
या चोरीच्या चेकबुकचा गैरवापर करून बँकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी संगनमत करून मोठी आर्थिक फसवणूक केली.एवढेच नव्हे तर आरोपींनी हॉस्पिटलमधील पेशंटचे नातेवाईक यांचे आधार कार्ड हॉस्पिटलमधील फाईलमधून चोरून त्याचा वापर बँकेत फसवणुकीसाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आरोपींनी ही फसवणूक एका रात्रीत केली नसून, ती अत्यंत पद्धतशीरपणे १० महिन्यांच्या कालावधीत केली आहे. १ ऑक्टोबर २०२५ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपींनी विविध तारखांना चेकद्वारे पैसे काढले.
यात दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी चेक क्र. ३१९ द्वारे रक्कम १,८८,००० रुपये, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी चेक क्र. ३२१ द्वारे १,१६,८०० रुपये, १ नोव्हेंबर २०२५ रोजी चेक क्र. ३२० द्वारे १,८४,८०० रुपये,१० एप्रिल २०२६ रोजी चेक क्र. ३३६ द्वारे १,९४,६०० रुपये आणि त्याच दिवशी चेक क्र. ३३९ द्वारे १,९४,६०० रुपये असे एकूण ९ लाख ४१ हजार ५०० रुपये परस्पर खात्यातून काढून घेतले.
या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा किती धोक्यात आहे.हे स्पष्ट झाले आहे.डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाच्या नात्याला या प्रकाराने धक्का बसला असून अकलूज परिसरात या आर्थिक फसवणुकीच्या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे.
तपास चक्रावून टाकणारा
ही घटना उघडकीस आल्यानंतर डॉक्टर राणे यांनी अकलूज पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी सिद्धांत वाघमारे आणि बँकेतील संबंधित कर्मचाऱ्यांसह अज्ञात इसमांविरुद्ध विविध कलम ान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल बी क्र १४५३ गायकवाड या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले बनावट कागदपत्रे आणि बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, लवकरच यातील इतर बड्या माशांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
बँकेच्या भूमिकेवर संशय
डॉक्टर राणे यांनी आपल्या तक्रारीत थेट बँकेच्या कर्मचाऱ्यांचा उल्लेख केल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. चेकवर असलेली सही, खात्यातील शिल्लक रक्कम आणि इतक्या मोठ्या रक्कमेचे व्यवहार होत असताना बँकेने नियमांचे पालन केले का? हा मोठा प्रश्रक आता उपस्थित होत आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय इतक्या सहजपणे चेक वटवणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.


