पुणे प्रतिनिधी सागर बोदगिरे
विमा पॉलिसी गहाण ठेवून शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे खोटे आमिष दाखवून विमा एजंटने लाखो रुपये प्रीमियमच्या विमा पॉलिसीज गळ्यात मारल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे. इतरांची फसवणूक होऊ नये यासाठी या प्रकाराला बळी पडलेले अमित जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन फसवणूक करणाऱ्या विमा एजंटची कार्यपद्धती उघड करून दाखवली आहे. विमा कंपन्यांनी अशा एजंट वर नियंत्रण ठेवावे आणि ग्राहकांनी खोट्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
स्टार युरेका इन्शुरन्स मार्केटिंग कंपनीच्या एजंटकडून विमा पॉलिसी विकत घेण्यासंदर्भात जोशी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ज्या विमा पॉलिसी आपण घ्याल त्याच्या दहापट रकमेचे कर्ज या पॉलिसीज गहाण ठेवून शून्य टक्के व्याजदराने आपल्याला दिले जाईल, असे आमिष या एजंटने जोशी यांना दाखवले. मात्र, प्रत्यक्षात अशा प्रकारचे कर्ज जोशी यांना कधीच उपलब्ध होऊ शकले नाही.
कर्जाचे आश्वासन देऊन संबंधित एजंटने जोशी यांना चार-पाच विमा कंपन्यांच्या पॉलिसीज विकल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जोशी यांनी संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी वगळता अन्य कंपन्यांनी प्रीमियमची रक्कम जोशी यांना परत केली. मॅक्स लाइफकडून मात्र सहा विमा पॉलिसीच्या प्रीमियमची तब्बल 65 लाखाची रक्कम परत करण्यास अजूनही टाळाटाळ केली जात आहे, असे जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या संदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात जोशी यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्राहक न्यायालयातही याप्रकरणी दाद मागण्यात आली असून त्याची सुनावणी सुरू असल्याचे जोशी यांनी नमूद केले.
विमा पॉलिसी खरेदी करताना आपण एजंटला दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यात त्यांच्याकडून फेरफार झाली असण्याची शंकाही जोशी यांनी व्यक्त केली. कारण जोशी यांच्या उत्पन्न मर्यादेत मिळू शकणाऱ्या विमा पॉलिसीपेक्षा अधिक विमा रकमेच्या, अर्थात अधिक प्रीमियम आकारणीच्या पॉलिसीज जोशी यांना देण्यात आल्या आहेत.
जोशी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे स्टार युरेका इन्शुरन्स मार्केटिंग कंपनीने लेखी स्वरूपात आपल्या कर्मचाऱ्याची चूक मान्य केली असून मॅक्स लाइफ इन्शुरन्समध्ये गुंतवलेली 65 लाखांची रक्कम लवकरात लवकर परत दिली जाईल, अशी लेखी ग्वाही 6 मार्च 2023 रोजी दिली आहे. मात्र, अजूनही ही रक्कम आपल्याला मिळालेली नाही, असेही जोशी यांनी नमूद केले. ग्राहकाने एकदा पॉलिसी काढली की त्याला हवे असल्यास ती पॉलिसी 15 दिवसांत बंद करता येते मात्र तो कालावधी टाळण्यासाठी एजंट आपला फोन बंद ठेवत असल्याचे निरीक्षण जोशी यांनी नोंदवले.
मोठ्या रकमेचे बिनव्याजी कर्ज मिळण्याच्या आशेने आपण विमा एजंटच्या भूलथापांना बळी पडलो तसे न पडता ग्राहकांनी विमा क्षेत्रात अथवा कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करताना सजग राहावे, असे आवाहन जोशी यांनी केले. मॅक्स लाइफ विमा कंपनीत अडकलेले आपले पैसे परत मिळावे आणि तीस ते पस्तीस टक्के कमिशन मिळवण्यासाठी खोटे बोलून विमा पॉलिसी विकणाऱ्या एजंट वर विमा कंपन्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जोशी यांनी पत्रकार परिषदेत केली.

