पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सीएसई) व पदव्युत्तर पदवी असलेल्या मास्टर ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लीकेशन्स (एमसीए) या दोन्ही विभागांतर्फे एकत्रितरीत्या ‘पालक मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याच्या निमित्ताने पालक आणि शिक्षक यांच्यात झालेल्या संवादाचा फायदा मात्र विद्यार्थ्यांना होणार हे निश्चित!
यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून महेश मोटे व महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ.अक्काताई साळुंखे हे उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.प्राजक्ता सातारकर व एमसीए विभागाचे प्रमुख प्रा. एम.वाय. शेख यांच्या नेतृत्वाखाली या पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. दीपप्रज्वलनानंतर कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातर्फे प्रा.व्ही.डी.जाधव तर एमसीए विभागातर्फे विभागप्रमुख प्रा. एम.वाय शेख यांनी आपल्या विभागातील विशेष लक्षवेधी सुविधांबाबत माहिती दिली.
यामध्ये प्रयोगशाळेत उपलब्ध यंत्र सामुग्री, मशीन्स पासून ते इंडस्ट्रीयल व्हिजीटच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कामकाज कसे चालते याचे प्रात्यक्षिक, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी, अत्यंत अवघड असणाऱ्या ‘गेट’ या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आदी संबंधित बाबींवर प्रकाश टाकला. गेट परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण आणि उच्च करिअरची दारे खुली होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांसंदर्भात विकासात्मक धोरण, नियोजनात्मक मार्गदर्शन आणि उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने स्वेरीत 'गेट' परीक्षेची करून घेतली जाणारी तयारी याबाबत सांगितले. प्रत्येक वर्षी विविध विषयांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित करून तसेच ‘ॲडव्हान्सड टेक्निकल ट्रेनिंग’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा परीक्षांसाठी आवश्यक संपूर्ण तयारी करून घेतली जाते. वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या टेस्ट आणि त्यांचे विश्लेषण यामधून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणातील अद्ययावत माहिती दिली जाते. त्यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांना अशा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळत असल्याचे सांगितले तसेच या परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारे सर्व स्टडी मटेरियल हे स्वेरीच्या नूतन इमारतीत असलेल्या मुख्य लायब्ररीमधून उपलब्ध करून दिले जाते, असे सांगण्यात आले.
प्लेसमेंट विभागाचे प्रा.ए.ए.मोटे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ‘गेट परीक्षा, स्वेरीमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या,प्लेसमेंट विभागामार्फत चालणारे कार्य, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीसाठी व करिअर करण्यासाठी आवश्यक बाबी, इंग्रजी भाषा कौशल्ये, संभाषण कौशल्य, सादरीकरण, प्रकल्प, तांत्रिक प्रशिक्षण इंटर्नशीप, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? हे करताना पालकांनी कोणती भूमिका घ्यावी ? आदी करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची माहिती पालकांना दिली.
यावर्षी २०२५-२६ मध्ये झालेल्या ‘गेट’ परीक्षेत कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातून एकूण अठरा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यावेळी यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश साळुंखे, बाबुराव गांडूळे यांच्यासह काही पालकांनी काही सूचना केल्या. यावर उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांनी काही सूचनांचे तात्काळ निरसन केले तर काही प्रश्न वरिष्ठ पातळीवर व चर्चेतून सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी दोन्ही विभागांतील प्राध्यापक वर्ग, जवळपास १०० पालक, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. सुप्रिया शेगदार यांनी सूत्रसंचालन केले तर विभागप्रमुख डॉ.प्राजक्ता सातारकर यांनी आभार मानले.

