पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी “प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्स” या विषयाअंतर्गत “प्रोजेक्ट मॅनेजमेंट केस स्टडी प्रेझेंटेशन” स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
अभियांत्रिकी शिक्षणातील सर्व शाखांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्स हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. या विषयामध्ये प्रकल्पाचे नियोजन, अंमलबजावणी, वेळ व खर्च नियंत्रण, जोखीम व्यवस्थापन तसेच संसाधनांचे प्रभावी नियोजन यांचा समावेश असतो. केस स्टडी पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक समस्यांचा अभ्यास करून त्यावर व्यवहार्य उपाययोजना सुचवण्याची संधी मिळते.
या स्पर्धेत महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी उद्योगक्षेत्रातील वास्तव समस्यांवर आधारित केस स्टडी सादर करताना प्रकल्प नियोजन, आर्थिक विश्लेषण, जोखीम ओळख आणि व्यवस्थापन यांसारख्या संकल्पनांचा प्रभावी वापर केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होऊन सैद्धांतिक ज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात उपयोजन करण्याची संधी मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी तसेच डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- संगणक विज्ञाल आणि अभियांत्रिकी विभागातील कोतवाल गिरिधर मनोहर, कुलकर्णी वैष्णव मुकुंद, माळी स्वप्निल मच्छिंद्र व साळुंखे हर्षदा सिद्धेश्वर यांनी पटकाविला तर उपविजेते क्रमांक १- विदयुत अभियांत्रिकी विभागातील रणजीत संजय अस्कट, साहिल बाळासाहेब काळे, राजशेखर महाजन भोसले, ऋषिकेश मिलिंद मस्के यांनी पटकाविले तसेच उपविजेते क्रमांक २ - यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील अप्पासो निलप्पा तेली, प्रतीक भारत यांकीकर, भार्गव प्रशांत शेटे व स्वप्निल संतोष शिरगुर यांनी मिळविले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अतुल आराध्ये, प्रा. अंजली चांदणे, प्रा. रमेश येवले, प्रा. राहुल घोडके आणि प्रा. मिलिंद तोंडसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारसरणी, सादरीकरण कौशल्य आणि संघभावना विकसित होण्यास मोठी मदत झाली.

