पालघर जिल्ह्यात बाल संस्कार शिबिरांचे आयोजन
मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
शाळांना लागणा-या मे महिन्यातील सुटटयांचे निमित्त साधुन सालाबादप्रमाणे यंदाही पालघर जिल्हयातील विविध ठिकाणी बाल सुसंस्कार शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था, देवघर यांच्या वतीने सलग ९व्या वर्षी रविवार दिनांक ३ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत भव्य बाल संस्कार निवासी शिबीराचे आयोजन वाडा तालुक्यातील देवघर गावी करण्यात आले आहे.
आजच्या मोबाईलच्या व विज्ञान युगामध्ये तरुण पिढी ही आपले आई वडिल, बहिण भाऊ व गुरुजन यांच्या आदरापासुन दुरावत चाललेली आहे. कारण कुटुंबे ही धनाने श्रीमंत झाली पण संस्काराची श्रीमंती गमावून बसली आहे. कामधंदयाच्या व्यापामुळे आज पालकांना मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. विभक्त कुटुंब पध्दतीमुळे वडिलधा-यांच्या संस्कारांपासुनही अनेक कुटुंबांतील मुले दुरावत चाललेली आहेत. संस्कार चांगले असतील तर संतती चांगली होईल. संस्कारक्षम संतती निर्माण होण्यासाठी प्रथम लहान मुलांवर चांगले संस्कार होणे अत्यंत आवश्यक आहे. याच उदात्त हेतुने देवघर पंचक्रोशीतील परमार्थिक हेतू जोपासणा-या हभप पांडुरंग म. भोईर यांच्या पुढाकाराने देवघर गावातील यंदा नव्याने सुरू होत असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या नूतन वास्तूमध्ये ह्या निवासी बाल सुसंस्कार शिबीराचे आयोजन सलग ९व्या वर्षी करण्यात आले आहे.
या शिबीरात परिसरातील जवळपास १०० मुले सहभागी होत असुन शिबीरादरम्यान आचरण व अध्यात्मिक संस्कारांबरोबरोबच योगासने, सूर्यनमस्कार, टाळ, पकवाज, पेटी, अभंग, हरिपाठ, हनुमान चालीसा, गीता, विष्णुसहस्त्रनाम इत्यादी गोष्टी मुलांना शिकविल्या जाणार आहेत. गेली ८ वर्षे या ठिकाणी या बाल संस्कार शिबीरासाठी परिसरातील मुले, पालक, ग्रामस्थ व दानशूर व्यक्तींचे अत्यंत मौलिक योगदान मिळत असल्याचे आयोजक हभप पांडूरग म भोईर यांनी सांगितले. ह्या शिबिरात योग मार्गदर्शक रुपाली भोईर, मृदंग शिक्षक करण भोईर, चरण मोकाशी, हार्मोनियम शिक्षक राम भोईर, हरिपाठ, हनुमान चालिसा, गीता, अभंग मार्गदर्शक लावण्या पाटील, मंदार पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन मुलांना लाभणार आहे. १ मे रोजी ह्या निवासी शिबिराचे उदघाटन आंतराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, गोवर्धन कृषिक्षेत्र गालतरे चे सदस्य रघुनाथ दास प्रभुजी, पालघर न्युज नेटवर्कचे प्रितेश पटेल, प्रा धनंजय पष्टे, हभप अप्पा महाराज, हभप बाळकृष्ण महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
अशाच प्रकारचे बाल संस्कार शिबीर श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्था, आळंदी सारशी (वाडा) यांच्यामार्फत हभप राजेश महाराज बांगर यांच्या पुढाकाराने केलठण (वज्रेश्वरी) येथील सरस्वती गणपत पाटील विद्यालय येथे सलग ५व्या वर्षी दिनांक ४ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत संप्पन्न होत आहे. आजच्या मोबाईलच्या युगात संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी बाल संस्कारांची नितांत गरज असुन त्यासाठी पालकांचे योगदान व इच्छाशक्ती फार महत्वाची असल्याचे हभप राजेश म बांगर यांनी सांगीतले. कलियुगाच्या भयानक वातावरणामध्ये लहान मुले संस्कारहीन बनत चालली आहे.
अशा वातावरणामध्ये मनुष्य हा आई-वडिलांना मानायला तयार नाही, म्हणून बाल मनावर चांगल्या संस्काराची जडण घडण होण्यासाठी संत वाङ्मयाच्या चिंतनाची आणि सहवासाची अत्यंत गरज आहे व हा हेतू अंतकरणामध्ये ठेवून गेल्या ४ वर्षापासून बाल संस्कार निवासी शिबिराचे आयोजन करत असल्याचे हभप बांगर महाराज यांनी सांगितले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना योगासने, भगवद्गीता, विष्णुसहस्रनाम, गायन, वारकरी गायन, मृदंग वादन, हरिपाठ आदी शिक्षण दिले जाणार आहे. या निवासी शिबिरातदेखील मुलांना अध्यात्मीक ज्ञानासोबतच संस्कारांचे धडे देण्यात येणार आहेत.
एकंदरीत ग्रामीण भागात उन्हाळी सुटटयांमध्ये सुरु झालेला बाल सुसंस्कार शिबीरांचा हा सिलसिला पाश्चात्य संस्कृतीचा अंगीकार करत असलेल्या व मोबाईल, इंटरनेटच्या महाजालात अडकत चाललेल्या आजच्या पिढीला संस्कारांची नवी दिशा दाखवणारा ठरत आहे.

