बार्शी प्रतिनिधी तेज न्यूज
विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (28 एप्रिल) बार्शीचा दौरा केला. भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने तब्बल 4 वर्षांनंतर बार्शीत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
राऊत यांच्या राजकीय भविष्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केलेले सूचक विधान सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजेंद्र राऊत यांनी बार्शीत जोरदार पुनरागमन केले आहे. बार्शी बाजार समिती, नगरपालिकेनंतर त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवर विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली आहे.
या पार्श्वभूमीवर, विधान परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून प्रशांत परिचारक, राम सातपुते आणि शहाजी पवार यांच्यासोबतच राजेंद्र राऊत यांचेही नाव आघाडीवर आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
बार्शीत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या निवडणुकीचा निकाल म्हणजे जनतेने मागच्या काळात जी चूक केली, त्याची जाणीव होऊन एक मोठा आशीर्वाद राजाभाऊंना जनतेने पुन्हा दिलेला आहे. वर्षानुवर्ष जनतेची सेवा करणारे, जनतेकरीता संघर्ष करणारे राजाभाऊ आहेत. त्यामुळे त्यांना अजून भरपूर राजकीय आयुष्य आहे. त्यांना अनेक पदं मिळतील.
भारतीय जनता पार्टीत त्यांच्यासारख्या नेत्याची निश्चितपणे कदरच होईल. विधान परिषदेकरीता कुठली नावं आहेत? त्याचे काय होणार आहे? याचा निर्णय मी घेत नाही. ते निर्णय आमचे पार्लमेंटरी बोर्ड घेते. तिथून जे निर्णय होतो तोच निर्णय घेतला जातो. पण राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

