डोंबिवली प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
प्रतिकुल परिस्थिती, कुटुंबियांचे सहकार्य व मार्गदर्शन, चिकाटी व अभ्यासू वृत्ती मेहनत करून शिवम वखरे यांनी यशाला गवसणी घातली.त्यांची आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) श्रेणीत निवड झाली.त्यांच्या या उज्वल यशाबद्दल शिवम सीमा राजेंद्र वखरे यांचा डोंबिवली येथील भंडारी मंडळाकडून निरंजन सोसायटी येथील कार्यालयात यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र शिक्षण संघटना अध्यक्ष सुहास मिर्लेकर, ग्लोबल टाईम्सचे संपादक रामचंद्र खडपे, शाखा प्रमुख व रिक्षा युनियन संघटना प्रमुख सुधीर पाटील, शिवसेना(उबाठा) सचिव बाबा सातार्डेकर, समाजसेवक बाळकृष्ण भिल्लारे, तसेच उत्सव मुर्ती शिवम वखरे यांचे वडील पोलीस अधिकारी राजेंद्र वखरे व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.सुहास हिर्लेकर यांनी आपल्या भाषणात सत्कारमूर्ती शिवम वखरे यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.मंडळाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण वराडकर, यांनी उपस्थितांसमोर मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
तसेच कार्यकारी मंडळातील संजय पोखरणकर,रहुवीर तांडेल, गोपाळकृष्ण वराडकर, प्रदीप पाटील, हे विश्वस्त तसेच मंडळाचे सदस्य वैभव शिरोडकर सपत्नीक आवर्जून उपस्थित होते.मंडळाचे अध्यक्ष रजनीश चौगुले यांनी सूत्रसंचालन करून व आपल्या कुशल भाषण शैलीत शेरोशायरी करून उत्सवमूर्तींचे गोड कौतुक केले.भंडारी मंडळाच्या वतीने आयपीएस अधिकारी शिवम वखरे यांना शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
भंडारी समाजाने केलेल्या या हृदयद्रावक सत्काराने आयपीएस अधिकारी शिवम वखरे भारावून गेले.आपल्या भाषणात परिक्षेत सुयश मिळविण्याकरिता वडील व कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आपले मत व्यक्त केले.शेवटी सांगता सोहळ्यात मान्यवर व उपस्थितांचे आभार मानून शिवम वखरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

