कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना, उमेदवारांना धक्का देऊन आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणीत समविचारी आघाडीने सत्ता काबीज केली. समविचारी आघाडीचे १३ आणि महायुतीचे १२ उमेदवार निवडून आले. रात्री साडे आठ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. एका बाजूला महायुतीचे दिग्गज नेते मैदानात असताना काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत विजय खेचून आणल्याने या निकालाची राज्यभर जोरदार चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ताकद सोबत असताना महायुतीच्या पदरी पराभव का आला, याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी रोखठोक भाष्य केलं आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील पराभवाला हसन मुश्रीफ यांनी महायुतीत अंतर्गत कुरघोड्यांना जबाबदार धरलं आहे. "गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी दिलेला निकाल आम्ही स्वीकारत आहोत. या निवडणुकीत महायुतीमध्ये शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणे आणि त्यानंतर झालेली युती कदाचित लोकांना आवडलेली नसावी," असं मुश्रीफ म्हणाले.
गोकुळच्या निकाल मान्य करत असताना हसन मुश्रीफ यांनी दूध संघाच्या विकासासाठी सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे. "या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. गोकुळ दूध संघाचे नवीन संचालक मंडळ कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कुटुंबांचे कल्याण साधेल अशा शुभेच्छा. सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाच्या भूमिकेतून गोकुळ दूध संघाच्या उत्कर्षासाठी लागेल ते सहकार्य करू," असं मुश्रीफ यांनी आश्वस्त केलं आहे.
*गोकुळमध्ये नेमकं काय घडलं?*
गोकुळ निवडणुकीत गेले काही दिवस प्रचंड चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत ९९ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच २५ जागांसाठी मतमोजणी झाली. त्यामध्ये त्यामध्ये समविचारी आघाडीचे १३ उमेदवार निवडून आले. महायुतीचे १२ उमेदवार निवडून आले आहेत. प्रमुख पराभूतांमध्ये माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास नारायण पाटील आणि नाविद मुश्रीफ यांचा समावेश आहे. समविचारी आघाडीच्या वतीने अनेक नवीन चेहरे निवडून आले आहेत.
दरम्यान, राज्यातील आघाडीची दूध संघ असणाऱ्या गोकुळवर कोणाची सत्ता येते याकडे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. निवडणुकीत महायुतीकडून अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

