पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या उमा महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या प्रा. डॉ. सुवर्णा हजारे डांगे यांना विटा (जि. सांगली) येथील भारतमाता ज्ञानपीठ संस्थेतर्फे राज्यस्तरीय ‘पद्मश्री पु. ल. देशपांडे मुक्तांगण शिक्षक रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुक्तांगण ग्रंथालय, विटा यांच्या माध्यमातून आयोजित ४४ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्ष तथा नामांकित कवी पुरुषोत्तम सदाफुळे पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि संत तुकारामांची मूर्ती देऊन डॉ. हजारे यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांच्यासह सुप्रसिद्ध उद्योजक प्रसाद गायकवाड, साहित्यिक शरद तांदळे, दौलतनाना शितोळे, आमदार सुहास बाबर, महेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुवर्णा हजारे डांगे यांनी साहित्य, मराठी भाषा, इतिहास संशोधन आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक सेवेसोबत अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनाधीनतेविरोधी जनजागृती, स्त्रीशक्तीचा जागर आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व प्रेरणा निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ व महिला : एक चिकित्सक अभ्यास’ या त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचे विशेष कौतुक करण्यात आले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी सादर व प्रकाशित केलेले संशोधनपर लेख शैक्षणिक क्षेत्रासाठी मोलाचे ठरले आहेत. शिक्षण, संशोधन आणि समाजप्रबोधन यांचा प्रभावी समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो.
हा पुरस्कार भारतमाता ज्ञानपीठचे सचिव वैशाली कोळेकर, कार्याध्यक्ष डॉ. ऋषिकेश मेटकरी आणि संस्थापक रघुराज मेटकरी यांच्या संस्थेतर्फे प्रदान करण्यात आला.
डॉ. सुवर्णा हजारे डांगे या प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड, पांडुरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांतराव परिचारक, प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक, प्रणव परिचारक, तानाजीराव वाघमोडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. हजारे यांच्या या सन्मानामुळे शैक्षणिक वर्तुळात विशेष समाधान आणि अभिमान व्यक्त होत आहे.

