मुंबई अतिथी संपादक राजा माने तेज न्यूज
महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीतील आणि सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक -राजकीय वाटचालीतील आजचा दिवस ऐतिहासिक ठरेल. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल झाला आणि बिनविरोध विजयी झाल्या. त्यांना उमेदवारी देण्याचा धडाकेबाज निर्णय घेवून शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवा इतिहास रचला!
डॉ. ज्योती वाघमारे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या डॉ. ज्योती उपजत गुणवत्ता आणि कष्टाच्या बळावर त्यांची आजवरची वाटचाल राहिली आहे. बारावी बोर्ड परीक्षेत त्या राज्यात पहिल्या आल्या होत्या. अभ्यासू वृत्ती,परिश्रम आणि आंबेडकरी चळवळीची कास धरत त्यांनी आपला प्रवास सुरु ठेवला. व्यासंगी प्राध्यापिका, प्रभावी वक्त्या, प्रवाही शैलीच्या वृत्त निवेदिका व सूत्रसंचालिका अशी ख्याती प्राप्त केली. खरे रत्नपारखी ठरले ते शिवसेना नेते एकनाथ शिंदे.
त्यांनी डॉ. ज्योती वाघमारे यांची गुणवत्ता हेरली आणि चार वर्षांपूर्वी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून कार्य करण्याची संधी दिली. डॉ. ज्योती यांनी संधीचे सोने केले. अल्पावधीतच त्या आक्रमक आणि अभ्यासू प्रवक्त्या म्हणून नावारूपास आल्या. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड या भाषेवरील प्रभुत्व आणि व्यापक वाचन ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गूण आहेत.


