छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची राज्याबरोबरच देशाला गरज -इतिहास तज्ञ प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तुत्वातून कणखर नेतृत्व, उत्तम व्यवस्थापन, सहिष्णूता, आत्मविश्वास, आदर्श टीम वर्क, दूरदृष्टी, वेळेचे अचूक व्यवस्थापन, गुणग्राहकता, लोकपालकत्व, दूरदर्शी विचार, संकट प्रसंगी संयमाने निर्णय, स्त्रियांचा सन्मान, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता असे विविध गुण डोकावतात. या गुणांमुळे छत्रपतींनी अवघा महाराष्ट्र घडविला म्हणून आता राज्याबरोबरच देशाला महाराजांच्या विचारांची गरज आहे.’ असे प्रतिपादन इतिहास तज्ञ प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मध्यवर्ती असलेल्या भव्य ओपन एअर थिएटरमध्ये आयोजिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास तज्ञ प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण हे आपले विचार मांडत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा व शिक्षण तज्ञ, गुजरात केंद्रीय विद्यापीठाच्या राष्ट्रपती प्रतिनिधी प्रा. डॉ. गीता नायक ह्या होत्या.
महाराष्ट्र गीत, स्वेरी गीत, शिवआरती व शिवमुर्ती पुजनानंतर प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले, ‘इंजिनिअर आणि फार्मासिस्ट बनत असताना सर्वप्रथम देशाचे जबाबदार नागरिक बनले पाहिजे. महाराजांचे आदर्श विचार हा व्यक्तिमत्त्वाचा भाग बनवून विद्यार्थ्यांनी लेखणी व कागद हातात घेतले पाहिजेत. २१ व्या शतकात तंत्रज्ञान हातात घेऊन तंत्रज्ञान व संशोधन विकसित करून मार्केटमध्ये यशस्वीपणे उतरले पाहिजे तरच आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासात भर पडेल आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले ‘विकसित भारत -२०४७’ हे पूर्णत्वाला येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही प्रसंगी भावनिकतेला कुठेही थारा दिला नाही. आपल्याला यशस्वी जीवन जगायचे असेल तर त्यांच्या विचारांचा ठेवा आपण जपला पाहिजे.’ असे सांगून महाराजांच्या कार्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.
प्रमुख पाहुणे डॉ. चव्हाण पुढे म्हणाले की, ‘शिवजयंतीच्या निमित्ताने ढोल ताशांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. महाराजांचे विविध पराक्रम अद्भुत आणि अविश्वसनीय आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना कर्तुत्व ही ईश्वरी देणगी नसून राजांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आपल्या कृतीतून ते सिद्ध केले आहे. म्हणून महाराजांच्या कर्तुत्वाचा अभिमान वाटतो. महाराजांच्या विविध कृतीतून असे अनेक पैलू स्पष्ट दिसतात. महाराजांचे वेगळेपण यात आहे की तत्कालीन शासक आणि रयत ज्या गोष्टींची कल्पना करत नसत ती बाब शिवाजी महाराज अमलात आणत असत. प्रत्येक घटनेकडे सकारात्मक पाहण्याची दृष्टी महाराजांची होती. ‘शिक्षा आणि अनुग्रह’ दोन्ही गोष्टी करता येतात तेव्हाच राजा मोठा होतो. कारण रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये हा आदेश छत्रपती शिवाजी महाराज देतात तेंव्हा त्यांच्यातील रयतेविषयी असलेली जागरूकता दिसून येते. राजांच्या या सुव्यवस्थित प्रशासनामुळे समाजात शेतकऱ्यांना सन्मानाचे स्थान प्राप्त झाले. म्हणून राजांची ‘प्रशासकीय व्यवस्था’ अत्यंत महत्त्वाची वाटते. म्हणून महाराजांचे कितीही पारायण केले तरी ते कमी आहे यासाठी ‘शिवचरित्र’ वाचण्यापेक्षा ते समजून घेणे व जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे.’ असे सांगून राजांच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थी तन्मय भोसले, प्रगती बागल व इतर विद्यार्थ्यांनी शिवरायांची महती सांगणारी भाषणे केली तर सुरज भोसले यांनी उत्तम पोवाडा सादर केला.
यावेळी विविध क्रीडा प्रकारात यश मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी सौ. चव्हाण, पंढरपूर विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले, स्वेरीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे, सचिव डॉ. सुरज रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मीनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, इंजिनिअरिंगच्या स्टुडंट कौन्सिलच्या सचिवा नेहा झिरपे, डिप्लोमाच्या वैष्णवी नवले, संस्थेअंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते. तनिशा लांडगे व प्रणिता व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.यशपाल खेडकर यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने शहाजी महाराजांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकत आभार मानले.
मुख्य प्रवेश द्वाराजवळ महाराजांची भव्यमूर्ती, आकर्षक रांगोळे, भगवे फेटे परिधान करून केलेले लेझीम नृत्य आणि आकर्षक सजविलेली पालकी सोहळा ही बाब लक्ष वेधून घेत होती.

