पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार समितीच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या आई-वडील सौ. मंदाकिनी नरसिंह चिवटे व नरसिंह मनोहरपंत चिवटे यांना “राजपिता शहाजी राजे आदर्श पालक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नरसिंह मनोहरपंत चिवटे हे स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे प्रांतिक सदस्य, महाराष्ट्र फर्टीलायझर सीड्स डीलर असोसिएशनचे संचालक तसेच ज्येष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत असून त्यांनी आयुष्यभर सत्य, प्रामाणिकपणा, राष्ट्रभक्ती आणि समाजभान जपले आहे. तर पत्नी मंदाकिनी चिवटे यांनी कुटुंबसंस्कार, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि सामाजिक जाणिवा जपत आदर्श माता म्हणून आपली भूमिका बजावली आहे.
राजपिता शहाजी राजांनी ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, त्याच आदर्श मूल्यांवर आधारित संस्कार चिवटे दाम्पत्यांनी आपल्या मुलांवर केले. त्या संस्कारांतून समाजासाठी कार्य करणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे घडले असून ते आज महाराष्ट्रभर आरोग्यसेवेसाठी उल्लेखनीय कार्य करत आहेत.
हा पुरस्कार केवळ एका कुटुंबाचा सन्मान नसून संस्कार, त्याग, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा गौरव आहे. चिवटे दाम्पत्यांच्या आयुष्यभराच्या कार्याची ही योग्य दखल असून हा सन्मान समाजातील प्रत्येक पालकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.


