मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
'काका, पास घरी राहिला आहे... माझ्या पप्पांना फोन करा, ते पैसे देतील...', अशी कळकळीची विनंती करत असलेल्या सातवीतील चिमुकल्याला एसटी बसमधून थेट महामार्गावर उतरविण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी मंगळवेढा तालुक्यात घडली. या प्रकारामुळे पालक, ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील प्रथमेश राहुल पाटील हा विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला ये-जा करतो. शनिवारी सायंकाळी पाच वाजता तो सोलापूर-मंगळवेढा या एसटीने प्रवास करत होता. वाहक तिकीट काढण्यासाठी आला. त्यावेळी प्रथमेशला पास घरी राहिल्याचे लक्षात आले. त्याने वडिलांना फोन करण्याची विनंती केली. मात्र, वाहकाने त्याचे न ऐकता बसचा दरवाजा उघडून त्याला थेट महामार्गावर उतरवले.
या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्याचबरोबर एसटी बसने प्रवास करायचा का नाही असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे सरकार मुलींना मोफत पास देत आहे तसेच पास मुलांना पण मिळावेत अशी मागणी पालकांमधून होताना दिसून येत आहे.


