अस्तित्व टिकवायच असेल तर चेहरा बदलावा का ?
सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचा निकाल एकीकडे आणि पंढरपूरचा मात्र दुसरीकडे. संपूर्ण राज्यात भाजपाची हवा असताना , महायुतीची लाट असताना पंढरपूर तालुका या हवेवर देखील प्रस्थापित नेतृत्वांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पूर्ण यश मिळविता आले नाही , यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. गाव गेले आणि आता तालुकाही गेला.... पांडुरंग परिवारासाठी आणि व्यक्तीश : परिचारक कुटुंबासाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे. आता त्यांच्या स्वभावानुसार ते या धोक्यांना ' घंटाsss ' मानत नाहीत , हा भाग वेगळा. पण खालचा कार्यकर्ता तुटतो आहे , खचतो आहे याचे भान ठेवत आता तातडीने जर बदल केले नाहीत तर परिचारक गटाची अवस्था औदुंबर अण्णाच्या गटासारखी होईल . केवळ अस्तित्वापुरती ..!
आयात_नेत्यांचं_जोखड !
भाजपाचे बळ वाढवण्यासाठी विरोधकातील सक्रिय नेतृत्व आपलेसे करायचे आणि त्यामध्ये मराठा , ओबीसी या सगळ्यांची जातीय समीकरणे घडवून आणायचे पॅटर्न देखील पंढरपूर तालुक्याने फेल ठरवले .
विरोधकांच्या फुटीची घमेंडीची भाषा जी पालकमंत्र्यांनी वापरली ती लोकांना रुचली नाहीत , परंतु या एकीकरणात देखील फारसे शक्तिशाली नेते भाजपला मिळाले नव्हते , याचे भान त्यांना शेवटपर्यंत हरपले होते कल्याणराव काळे एक अत्यंत मर्यादित आणि संकुचित गट आहे . त्यांचा पक्षाला काय उपयोग होणार ?
या प्रवेशामुळे ते स्वतःच्या घरातही संपून गेले. मुळात विठ्ठल परिवार किंवा औदुंबरांना पाटील गटाचा राजकारणाचा बेस हा ' परिचारक विरोध ' हाच होता. त्यात काळे , भालके , पाटील सर्व आले. या सर्वांनी एकमेकात संघर्ष केला पण परिचारक विरोध हा त्यांचा धागा कायम राहिला ..कल्याणराव काळे यांनी अस्तित्वाच्या धडपडी करिता परिवाराच्या त्या मूळ तत्वालाच लाथडले . त्यामुळे ते स्वतः भाजपात गेले असेल तरी त्यांचा ( उरला सुरला ) गट जाणार नाही हे स्पष्ट होतं . ते जिथे जातात तिथे पराभव होतो, हा इतिहास तरी पालकमंत्र्यांनी तपासून घ्यायला हवा होता..
यशाचे_श्रेय_अपयशाचीजबाबदारी
आठ पैकी पाच जिल्हा परिषद गटांवर जरी भाजप विरोधी उमेदवार निवडून आले असले तरी ते यशही कुण्या एकट्याचे नाही . अभिजीत पाटील , भागीरथ भालके यांच्यासारख्या नेत्यांसह स्व.अजित पवारांबाबत असलेली सहानुभूती , मराठा एकीकरण याचे हे संयुक्त यश आहे.
या संपूर्ण यशाचे खरे दावेदार आहे ते त्याच्या गटांमध्ये उभारलेले उमेदवार ! ग्रामीण स्तरावर असलेल्या भाजप विरोधी वातावरणाचा , जातीय समीकरणाचा , आपल्या स्वतःचा प्रभावाचा त्यांनी पुरेपूर वापर केला ..त्यांनी स्वतःच्या हिमतीवर हे गट निवडून आणले.
परंतु अपयशाचे धनी मात्र शंभर टक्के पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपाचे तालुकास्तरीय प्रतिनिधित्व करणारे प्रशांत परिचारक हेच आहेत , त्यामुळे या अपयशाची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल.
गटांची_गणिते
कासेगाव सारखा प्रतिष्ठेचा गट हा भालके सारख्यांनी व्यूहरचनेतून खेचला यापेक्षा तुमच्या सो कॉल्ड ' चाणक्य नीती' चा अपमान कोणता असू शकतो ? ओबीसी साठी आरक्षित झालेला हा गट व्यंकटराव भालके यांनी केवळ तांत्रिक मुद्द्यावर लढवला आणि तेथे सरळ सरळ ओबीसी विरुद्ध मराठा असे मतदान झाले.
आपल्या होम पीच असलेल्या खर्डी सारख्या गावातून केवळ 400 मताधिक्याने आपला उमेदवार निवडून यावा याचाही विचार करायला हवा.
रोपळे , भाळवणी परिचारक यांचे कधी नव्हतेच पण तेथे तुम्ही ' सुपारीवर आणलेल्या नेत्यांचा ' उपयोग झाला नाही , हे लक्षात ठेवले पाहिजे. वाखरी गटात कोणत्या विभीषणाने ठरवून कुणाची लंका जाळली काय ? याचा तपास करावा लागेल .
भोसे मध्ये ४० वर्षाची अँटीइन्कमबन्सी होती . राजकारणाची पठडी बदलली आहे. केवळ वाड्यावर दोघांना बोलवून तंटे सोडवणे म्हणजे आपण गाव पुढारी होत नाही , हे नव्या पिढीला समजून चुकले असेल. आपल्या पूर्वजांनी चालवलेले उसाचे राजकारण , सुरू केलेली गुऱ्हाळे हे चालू ठेवले पाहिजेत आणि लोकांना पैसाच मिळवून दिला पाहिजे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
गोपाळपूरचे यश हे सत्ताधाऱ्याचे आहे ना विरोधकाचे. येथील ' अधिकारशाही ' चे ते यश आहे.. त्यामुळे ते भाजपाचे मानता येणार नाही . अंकुशराव यांची उमेदवारी राष्ट्रवादीची असली असती तती तेथे त्याच निवडून आल्या असत्या .
नव्या_नेतृत्वाचे_प्रवासी
या सगळ्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील या नेतृत्वाचा नव्याने उदय होत आहे.. तसेच भगीरथ भालके आणि अभिजीत पाटील या नव्या एकत्रित प्रवासाची निश्चिती होत आहेत.. एकाने शहर सांभाळायचे , एकाने तालुका अशा पद्धतीची सामंजस्याची विभागणी झाली तर भाजपा आणि परिचारात गटासमोर एक मोठे आव्हान करू शकेल . भगीरथ भालके यांनी आमदारकी च्या उमेदवारी वेळी पायात पाय घातला म्हणून यश दाराबाहेरच थांबले. नगराध्यक्षाच्या निवडणुकीत ' महिला आरक्षणा' मुळे का होईना पण चाचणी यशस्वी झाली , डॉ. प्रणिता भालके गुंडगिरी आणि दहशतीच्या वातावरणात करत असलेले काम त्यांच्या प्रति सहानुभूतीची किनार वाढविणारे ठरत आहे . अभिजीत पाटील यांनी पालकमंत्र्यांना शेवटी गुडघ्यावर आणले , यातच त्यांच्या नेतृत्वाची उंची दिसून येते. अर्थात या दोघांनाही आपली विश्वासार्हता अधिक ठळकपणे सिद्ध करावी लागेल.
गृहपाठाचा_वेळ
काही महिन्यातच पांडुरंग सहकार्याची निवडणूक आहे. त्यानंतर तीन वर्षात पुन्हा नव्याने विधानसभेला सामोरे जायचे आहे. आता तीन वर्षे कुठलीही निवडणूक नाही. त्यामुळे संघटना बांधण्यासाठी भाजपला आणि परिचारक यांना पुरेस वेळ आहे. यातील प्रत्येक दिवसाचा त्यांनी सदुपयोग केला तर ही विस्कटलेली घडी बसवण्याची संधी त्यांना मिळू शकते. वाड्यापासून बंगल्यापर्यंत त्याच त्या सात-आठ लोकांची चौकट ओलांडून थोडं नव्या कार्यकर्त्यांना जवळ घ्यावे लागेल . सुदैवाने भाजपाची सत्ता आहे आणि मुख्यमंत्र्यांची त्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी ते बरंच काही करू शकतात . या दोन्ही तालुक्यात काम करण्यात त्यांना वाव आहे .
उंबरा_बदलावा_का ?
सातत्याने पराभव पदरी घेत असल्यामुळे कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकण्यासाठी आपला चेहरा बदलावा का ? याचाही विचार प्रशांत परिचारक यांनी करायला हरकत नाही . अर्थात त्यासाठी त्यांना थोडे ' मन मोठे ' करावे लागेल. या निवडणुकीत , सातत्याने येत असलेले अपयश 'उंबरा बदलून बघितला ' तर माप ओलांडेल का ? याची चाचणी करायला हरकत नव्हती . पण प्रणव परिचारक यांना अर्ज मागे घ्यावा लागला. तीन वर्ष पाहायला गेले तर लहान कालावधी आहे. पण प्रत्येक दिवस कामाचा ठेवला , संपर्काचा ठेवला तर या तीन वर्षात बरेच काही घडू शकते . विशेषतः आपल्यासमोर कुठलाही एक पक्ष , विचार पद्धती , संस्थात्मक जाळे नसलेले विरोधक असताना एक प्रकारची सुलभता आहे.
याचा नेमका उपयोग करावा लागेल . हा गट जिवंत राहावा किंबहुना पहिल्यासारखा पुनर्जीवित व्हावा , सत्तेमध्ये पुनर्प्रस्थापित व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना आहे.
लेखन अनिरुद्ध बडवे राष्ट्र संचार

