वर्धा प्रतिनिधी तेज न्यूज
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या भावना व्यक्त करताना वेदना होत आहे. एका शैक्षणिक सत्रात (१६/०६/२०२५ ते ३०/०४/२०२६) शिक्षकाला आपल्या विषयाचे नियोजन करून परीक्षेद्वारे विद्यार्थ्याचे मूल्यमापन करून त्याची गुणवत्ता सिद्ध करावी लागते.मात्र हे सर्व करीत असताना अनेक शैक्षणिक व अशैक्षणिक कामे पार पाडावी लागतात.अगदी प्राचीन काळात गुरुकुल पद्धतीने शिक्षणाचे कार्य केले जात होते.द्रोणाचार्य-अर्जुन, दादाजी कोंडदेव - शिवाजी महाराज ही गुरु-शिष्य परंपरा दिसून येते.मात्र अलीकडील प्रचलित शिक्षण पद्धतीत वाढत्या ऑनलाईन कामाच्या व्यापामुळे विद्यार्थी केंद्रित शिक्षक आपल्या अध्यापनाच्या कामातून भरकटलेला आहे.मागील काही वर्षांपासून ऑनलाईन प्रक्रियेतील कागदी घोडे नाचविताना कामाचा एवढा व्याप वाढला की शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.या शैक्षणिक व अशैक्षणिक कामामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांची ढासळत चाललेली मानसिकता याची जाणीव शासनाला होईल की नाही हा फार गहन प्रश्न आहे.
अगदी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला वर्ग ११ विचे ऑनलाईन प्रवेश करताना ग्रामीण भागातील सुविधांचा अभाव पाहता ते कितपत शक्य आहे.मात्र शासनाची भूमिका आग्रही आहे कारण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवून शासनाला दरवर्षी मोठा निधी प्राप्त होत आहे.त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी शासन आपली भूमिका मागे घ्यायला तयार नाही.ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवून मागच्या वर्षी शेवटला प्रवेश पूर्ण करण्यासाठी दिवाळी सण उजाडला होता.ते होते न होते प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची नोंदनी udise आणि saral portal वर करण्याची सक्ती केली जाते.त्या निर्णयाची योग्य अंमल बजावणी करण्यासाठी शिक्षक आपल्या जीवाचे रान करतो.मात्र शासनाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबर महिन्या पर्यंत सुरू असताना संच मान्यतेसाठी ३०/०९ चाच पट निश्चित केला जात असतो.त्याद्वारे वर्ग तुकड्या कमी होऊन अनेक शिक्षक excess होत असल्याने कौटुंबिक प्रश्न निर्माण होत आहेत.
A.C. च्या थंड हवेत बसून शासन,अधिकारी आणि कर्मचारी आवश्यकता नसताना शिक्षक विरोधी धोरण ठरवीत असतांत आणि बिचारा शिक्षक आपले शैक्षणिक कर्तव्य म्हणून ते निर्णय मान्य करीत जातो.मात्र या शासनाला जाग कधी येणार?मागील शैक्षणिक सत्रात सुद्धा शासनाने शेवटला विद्यार्थी प्रवेशित होत नाही तोपर्यंत प्रवेश घेतले मात्र संचमान्यता ३० सप्टेंबरच्या प्रवेशित संख्येवर निर्धारित करून अनेक शिक्षकांना अतिरिक्त दाखवून त्यांचे समायोजन केले.हे समायोजन करताना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यासोबतच mbu, pen, aadhar validation,apaar id काढून द्यायचे काम शिक्षक विद्यार्थी हित लक्षात घेऊन पूर्णत्वास नेत आहे. ही सर्व ऑनलाईन कामे जबाबदारीने पूर्ण करताना विलंब किंवा काही चुका झाल्यास तर अधिकाऱ्याची बोलणी त्यांनाच खावी लागते.
यात भर म्हणून या वर्षी शासनाने वर्ग १ते १२ वी वर्गातील विद्यार्थ्यांची पट पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आणि त्याचा मुहूर्त साधला तो दिनांक ११/१५/२२ एप्रिल २०२६ ला.एकीकडे विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र उन्हाने होरपळत असताना हे शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्येक शाळेत १००% उपस्थिती तपासणी करत आहेत.परीक्षा आटोपल्या असताना,लग्नप्रसंग असे विविध प्रसंग गावा- गावात चालू असताना शिक्षक विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत. एवढे करूनही जर शाळेत पट कमी राहिला तर विद्यार्थी बोगस,शासनाचे अनुदान लाटण्यासाठी अतिरिक्त विद्यार्थी भरती असा शेरा त्याच्या प्रामाणिक प्रयत्नाला दिला जातो आहे.ही सर्व तारेवरची कसरत करावी लागत असल्याने त्या शिक्षकाची तारांबळ उडते.
अनेकदा आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी असहकार आंदोलन करत मूल्यमापनावर बहिष्कार टाकला जातो मात्र तिथेही विद्यार्थी हित लक्षात घेऊन माघार घेतली जाते.आता दिनांक १०/०४/२०२६ पासून वर्ग ११ वीचे ऑनलाईन प्रवेश करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.पण वर्ग १० विचा निकाल लागण्यापूर्वी हे गरजेचे का ? केवळ शासनाची तिजोरी भरण्यासाठी राबविण्यात आलेली ही योजना तर नाही ना? असा सवाल शिक्षक उपस्थित करीत आहे.एवढेच नव्हे तर सार्वजनिक निवडणुका,जनगणना या कामातही येणं उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना वणवण भटकावे लागणार आहे.या सर्व बाबीवर सखोल विचार करून शासनाने शिक्षकांचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत व देशाचा आधारस्तंभ म्हणून शिक्षकाची भूमिका मान्य करायला पाहिजे.शासन वरील सर्व बाबींचा योग्य विचार करून योग्य तो निर्णय घेऊन शिक्षकांचा मान सन्मान उंचावण्यासाठी प्रयत्न करेल अशी आशा व्यक्त करतो.......
निर्णयाच्या प्रतीक्षेत
प्रा. अमित प्रभाकरराव चिनेवार (९८२३४६५५०८)
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक,
यशवंत महाविद्यालय,सेलू.

