खेडभोसे प्रतिनिधी तेज न्यूज
मलेशिया, थायलंड येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा पैलवान किशोर पवार याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.
इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धा मलेशिया येथे सुरू आहे. या स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करत पैलवान किशोर पवार याने श्रीलंका, मलेशिया देशाच्या पैलवानांना धूळ चारली, त्यानंतर सुवर्ण पदकासाठी थायलंडच्या पैलवानाला अस्मान दाखवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
खेडभोसे (ता. पंढरपूर) गावचा सुपुत्र असलेला पैलवान किशोर याचे आई - वडील हे शेती करत किशोर याला कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. पैलवान किशोर हा कोल्हापूर येथील शाहू विजयी गंगावेश तालीम येथे वस्ताद विश्वास हरगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्या शिकत आहे. सध्या त्याला भारतीय सेना प्रशिक्षक उत्तम पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
सुवर्णपदक मिळवून देशात नाव कमावलेला पैलवान किशोर पवार हा यशवंतभाऊ पाटील महाविद्यालय,भोसे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक गणेश पाटील, प्राचार्य संजय मुजमुले यांच्यासह सर्व शिक्षक, खेडभोसे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

