तळेरे प्रतिनिधी - गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
असे अधिकारी बना की ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेलच पण, तुमच्या आई वडिलांना, गुरुंना आणि संपूर्ण गावाला अभिमान वाटला पाहिजे. असे स्वप्न घेऊन जगायचे असते आणि त्यासाठी प्रचंड मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न करा. कोणतेही स्वप्न कठीण नाही, त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे, असे प्रतिपादन ध्रुव अकॅडमीचे संचालक महेश सावंत यांनी केले.
ते फणसगाव कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिरातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रात बोलत होते. हे शिबिर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उंडिल नं.1 येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप नारकर, फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे प्रमुख कार्यवाह संदेश नारकर, प्रसिध्द व्यावसायिक राजेंद्र नरसाळे, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, सरपंच प्रियंका सरवणकर, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा नर, महाविद्यालयाच्या प्राचार्य अनुश्री नारकर, अक्षरोत्सव प्रमुख निकेत पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरादरम्यान मुलांना विविध व्याख्याने आणि प्रत्यक्षिकाद्वारे लोकशाही नेतृत्व, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जाणीव, स्वयंरोजगार व पर्यावरण संवर्धन, स्वच्छता - आरोग्य विषयी जनजागृती अशा विविध गुणांची रुजवात केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप नारकर म्हणाले की, ध्येय निश्चित केल्याशिवाय ध्येयासाठीचे प्रयत्न योग्य दिशेने होत नाहीत. त्यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करा. त्यासोबतच नियमित वर्तमानपत्र वाचलेच पाहिजे. कारण, वर्तमानपत्र वाचन हे ज्ञानाचे भांडार आहे, त्याचा योग्य वापर करा, यश तुमचेच आहे.
यावेळी गुरुनाथ तिरपणकर, संदेश नारकर, राजेंद्र नरसाळे, प्रियांका सरवणकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुचिता चव्हाण तर आभार प्रा. ज्योत्स्ना कदम यांनी मानले.

