‘राष्ट्रीय सेवा योजने’तून उद्याचे जबाबदार नागरिक घडतात -सरपंच रामचंद्र घाडगे
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘राष्ट्रीय सेवा योजना’ ही विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी असून, या माध्यमातून तंत्रशिक्षण घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागाशी एकरूप होतात, तेथील नागरिकांच्या समस्या समजून घेतात व समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे भरीव कार्य करतात. एकूणच ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या माध्यमातून उद्याच्या भारताचे जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य केले जाते.’ असे प्रतिपादन अजनसोंड येथील सरपंच रामचंद्र घाडगे यांनी केले.
स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे अजनसोंड (ता. पंढरपूर) मध्ये आयोजिलेल्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चा नुकताच समारोप करण्यात आला.यावेळी अजनसोंडचे सरपंच रामचंद्र घाडगे हे मार्गदर्शन करत होते. ‘राष्ट्रीय सेवा योजने’अंतर्गत ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे दि.१० जानेवारी २०२६ ते दि.१६ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप दि. १६ जानेवारी २०२६ रोजी पार पडला.
स्वेरी या संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी चिंचणी (ता. पंढरपूर) गाव हरित करणारे मोहन अनपट यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संपूर्ण आठवडाभर परिश्रम घेऊन शिक्षण, आरोग्य, ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड व जलसंवर्धन आदी विषयांवर विविध उपक्रम व जनजागृतीद्वारे उल्लेखनीय व अनुकरणीय कार्य केल्याचे सरपंच रामचंद्र घाडगे यांनी सांगून स्वेरील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांकडून पडीक जमिनीचा उपयोग, वृक्षलागवड, स्वच्छता मोहीम, झाडांना पाणी देणे, गावातून जनजागृती रॅली काढणे, पथनाट्य सादरीकरण तसेच शाळांमध्ये चित्रकला, निबंध व विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘स्वेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली शिस्त व कार्यतत्परता ही उल्लेखनीय असून, त्यांनी केलेले कार्य नेहमीच गुणवत्तापूर्ण असते,’ असे सांगत अजनसोंड ग्रामस्थांनी स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, डॉ. धनंजय चौधरी तसेच सहभागी स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला व क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास उपसरपंच बाळासो कांबळे, ग्रामसेविका श्रीमती सविता हंजगीकर, शांताप्रभू प्रशालेचे शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी मेटकरी यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे यांनी आभार मानले.

