अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
यशवंत नगर येथील अग्रगण्य शैक्षणिक महर्षि संकुल येथे 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत दिमाखात आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा करण्यात आला.विविध विधायक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संकुलाने भारतीय लोकशाहीचा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा केला.
ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग अकलूज, सुषमा संतोष महामुनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माळशिरस , सिद्धार्थ गायकवाड विभागीय सहसंचालक शाखा अमरावती, सभापती अॅड .नितीनराव खराडे ,प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक आठ वाजता संकुलाच्या भव्य प्रांगणात झाली .प्रमुख अतिथी माननीय संतोष वाळके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतांच्या सुरांनी आणि ध्वजगीत व राज्यगीताच्या सुरेल गायणाने संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता. संकुलातील बालवीर व वीरबालाच्या पथकातील छात्रसैनिकांमार्फत ध्वजाला मानवंदना देण्यात आली .छात्रसैनिकांनी बँड पथकाच्या तालावरील संचलनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तिरंग्याला दिलेली सलामी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुरण चढवणारी ठरली.
संविधान प्रास्ताविकाचे वाचन करत उपस्थित सर्वांच्या मनात संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. शिस्तीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या सामुदायिक कवायतीतून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या शिस्त, समता व एकतेचे दर्शन दिसून आले. व्यासपीठावरील प्रमुख अतिथींचा सन्मान समारंभ संकुलाच्या वतीने संपन्न झाला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हरवलेली मोठी रक्कम प्रामाणिकपणे परत देऊन प्रामाणिकपणाचा झेंडा फडकवणाऱ्या बारावी कला शाखेतील महेश विशाल काळे व ओम संजय सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते संपन्न झाला.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत शिक्षक गटातून प्रथम क्रमांक मिळवलेले योगशिक्षक प्राध्यापक धनंजय देशमुख यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न झाला.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ आयोजित त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेत महर्षि प्रशालेतील मेघराज तानाजी तांबिले याने सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला याबद्दल प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते सन्मान समारंभ पार पडला.
भारत देशाचा प्रजासत्ताक दिन या विषयावरील इरीना पठाण विद्यार्थिनीच्या ओघवत्या भाषणाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी एकसंघपणा व अनुशासन गुणांचा अवलंब करणाऱ्या मानवी मनोऱ्याचे सुरेख सादरीकरण केले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मेरा मुल्क मेरा देश हे देशभक्तीपर गीत, लक्ष्मीबाई कन्या प्रशालेने आम्ही शिवकन्या स्फूर्ती गीत सादर केले.
महर्षि प्रशालेच्या मुलींच्या लेझीम संघाने महाराष्ट्राची लोकसंस्कृती दर्शवणारे 22 कौशल्यांसह पारंपारिक लेझीम सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.निरक्षरतेचे निर्मूलन करून आत्मनिर्भर व सुशिक्षित भारत घडवण्यासाठी सर्वांमार्फत असाक्षरमुक्त भारत शपथ घेण्यात आली.
प्रमुख अतिथी संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांनी आपल्या मार्गदर्शनात संविधानाचे महत्त्व विशद करत लोकशाहीच्या या उत्सवात तरुण पिढीने संविधानातील मूल्ये आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे, कैलास चौधरी, विनोद जाधव ,नितीन इंगवले देशमुख ,जया गायकवाड ,मुख्याध्यापक शिवाजी पारसे, मुख्याध्यापिका अनिता पवार, उपमुख्याध्यापक आसिफ झारेकरी, पर्यवेक्षक उमेश बोरावके, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, यशवंतनगर परिसरातील नागरीक ,पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी गायकवाड यांनी केले . सदर कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने झाली.

