पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने दिनांक २३ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौ-याअंतर्गत विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्यातील बेंगलोर व म्हैसूर येथील महत्त्वाच्या औद्योगिक, ऐतिहासिक व स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना भेटी देत प्रत्यक्ष अभ्यास केला.
या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी बेंगलोर येथील विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजिकल म्युझियमला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी संकल्पना, औद्योगिक प्रक्रिया व नवकल्पनांविषयी सखोल माहिती घेतली. संग्रहालयातील विविध प्रतिकृती व प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष उपयोगाची जाणीव झाली.
तसेच सहलीदरम्यान म्हैसूर पॅलेस व आसपासच्या इतर ऐतिहासिक स्थापत्य संरचनांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या भेटीत विद्यार्थ्यांनी प्राचीन स्थापत्यशैली, नियोजन, बांधकाम साहित्य व सौंदर्यदृष्ट्या केलेली रचना यांचा अभ्यास केला. यासोबतच चित्रदुर्ग किल्ला येथे भेट देऊन तेथील पुरातन किल्ला स्थापत्य, संरक्षणात्मक रचना, दगडी बांधकाम पद्धती व ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले.
याशिवाय विद्यार्थ्यांसाठी सोलापूर-बेंगलोर महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते व पायाभूत सुविधांच्या बांधकाम कामांचा प्रत्यक्ष अभ्यास आयोजित करण्यात आला. या अभ्यास दौ-यातून आधुनिक महामार्ग बांधकाम तंत्र, साहित्य वापर, कामाची अंमलबजावणी व व्यवस्थापन याविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या औद्योगिक शैक्षणिक सहलीत स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे यांच्या संकल्पनेतून सदर औद्योगिक शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या सहलीसाठी विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. यशवंत पवार, प्रा. गणेश लकडे व प्रा. सिद्धेश पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ही शैक्षणिक सहल अत्यंत उपयुक्त, व यशस्वी ठरली.
अशा प्रकारच्या शैक्षणिक दौ-यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडून त्यांना भविष्यातील अभियांत्रिकी कारकिर्दीसाठी दिशा मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

