गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
गावाचे माजी उपसरपंच आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर नारायण फाटे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एक अत्यंत स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवला आहे. रक्षा विसर्जनाचा परंपरागत विधी न करता, फाटे कुटुंबीयांनी तिसऱ्या दिवशी राखेतून वृक्षारोपण करत पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी जपली आहे.
परंपरेला फाटा, पर्यावरणाला साथ
स्वर्गीय ज्ञानेश्वर फाटे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात येणारा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम फाटे कुटुंबीयांनी नदी किंवा जलाशयात न करता, त्याला एक नवी दिशा दिली.
कुटुंबीयांनी जमिनीत खड्डे केले.या खड्ड्यांमध्ये रक्षा (अस्थींचे राहिलेले भस्म) मिसळून टाकली. त्यानंतर याच खड्ड्यांमध्ये आंब्याच्या झाडांची रोपे लावून पर्यावरणपूरक विधी पूर्ण केला.
यामुळे रक्षा थेट पाण्यात विसर्जित न होता, ती मातीत मिसळली आणि त्यातून नव्या जीवनाची, म्हणजेच वृक्षांची, वाढ सुरू झाली. हा उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
गादेगाव सह पंचक्रोशीतून कौतुक
फाटे कुटुंबीयांच्या या विचारांना आणि कृतीला गादेगावसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून कौतुक होत आहे . धार्मिक विधीला पर्यावरण रक्षणाची जोड देण्याचा हा आदर्शवत उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
ज्ञानेश्वर फाटे यांचे कार्य समाज आणि सहकार क्षेत्रात मोलाचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या या पर्यावरणपूरक निर्णयामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची उंची अधिक वाढली आहे.
"रक्षा विसर्जनाचा परंपरागत विधी करताना अनेकदा पर्यावरणाची हानी होते. पण, आम्हाला ज्ञानेश्वर अप्पांकडून जे समाजभान आणि माणुसकीचे संस्कार घेतले, ते जपण्याचा निर्णय घेतला.
आम्ही लावलेले हे नुसते झाडाचे एक रोप नाही, तर हे रोप म्हणजे आमच्या अप्पांच्या पवित्र संस्काराचे, त्यांनी आम्हाला दिलेल्या मायेच्या आणि वात्सल्याच्या शिकवणीचे, तसेच त्यांच्या विशाल माणुसकीचे जिवंत आणि शाश्वत प्रतीक आहे. या रोपातून त्यांची आठवण आम्हाला नेहमी हिरवीगार प्रेरणा देत राहील."
नागेश एकनाथ फाटे
(प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग व्यापार विभाग)

