कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिंकदरचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक दर्शनी तपासातून समोर आला आहे. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे पोलिस तपासातून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबीयांना बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी 2023 च्या माती गटातील अंतिम लढतीत पंचाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर, सिकंदर शेख याची महाराष्ट्रात चर्चा झाली होती. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी त्याला खांद्यावर घेतलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर बोट ठेवत सिकंदरच्या बाजूने सोशल मीडियात खूप मोठे ट्रोलिंग झालं होतं. कुस्तीवरुन राज्यातील वातावरण तापलं होतं. त्यानंतर, पुढच्याच वर्षी सिकंदरने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2024 ची मानाची गदा पटकावली होती. तत्पूर्वीच, मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं त्याने म्हटलं होतं. पंढरपूरमध्ये बोलताना सिकंदर शेख यानं आपणच जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं सांगत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पराभवावर उत्तर दिले.
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर जवळच्या भीमा साखर कारखान्यावर भीमा केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा सिकंदर शेखने पंढरपूरमध्ये हे वक्तव्य केलं होतं. मात्र, आज अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याला अटक झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, सिकंदरच्या अटकेनंतर राज्याच्या कुस्ती क्षेत्रात देखील चर्चांना उधाण आलं आहे. सिकंदरच्या बाजुने आणि विरोधातही प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी, लवकरच अधिक माहिती समोर येईल.

