शिरोळ प्रतिनिधी तेज न्यूज
शिरोळ तालुका व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आले आहे.आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या पुढाकाराने दत्त साखर कारखान्याच्या दहा किलोमीटरच्या परिघातील शेतकऱ्यांसाठी “खुद तोड, खुद वाहतूक” हा अभिनव प्रयोग या हंगामात सुरू होत आहे. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटणार असून, त्यांना प्रति टन तब्बल ३९०० रुपये दर मिळणार आहे.
या प्रयोगाची रचना अशी आहे की शेतकरी स्वतः ऊस तोडणार, संघटनेकडून शुगर केन लोडरच्या साहाय्याने तो ऊस वाहनात भरण्यात येणार आणि नंतर संघटनेचेच वाहतूकदार ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, मजुरीचा खर्च आणि ऊस उशिरा तुटल्याने होणारे नुकसान टळणार आहे.
धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले की, शिरोळ परिसरात अनेकदा कारखान्याच्या जवळच्या शेतकऱ्यांचा ऊस उशिरा तुटत होता, तर लांबच्या भागातून आणलेला ऊस प्राधान्याने घेतला जात होता. या अडचणींवर मात करण्यासाठी “खुद तोड, खुद वाहतूक” हा प्रयोग आखण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उसाला अधिक दर मिळणार असून, ऊस वेळेत कारखान्यात पोहोचेल.
या प्रयोगात वापरण्यात येणारा शुगर केन लोडर कोईमतूर येथील प्रतिष्ठित बुल कंपनी कडून खास तयार करून घेतला आहे. हा लोडर ट्रॅक्टरवर बसवण्यात आला असून, दिवसाला तब्बल १०० टन ऊस भरण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे मजूर टंचाईवरही या प्रयोगामुळे मोठा तोडगा निघणार आहे.धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले की,हा प्रयोग शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवणारा ठरेल. ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत तुटेल, त्यांना योग्य दर मिळेल आणि कारखान्यालाही वेळेवर ऊस उपलब्ध होईल.शिरोळ परिसरात सुरू होणाऱ्या या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ऊस उद्योगातील हा प्रयोग राज्यभरातील ऊस उत्पादकांसाठी आदर्श ठरण्याची चिन्हे आहेत.


 
 
 
 
 
 
