पनवेल प्रतिनिधी तेज न्यूज
पनवेल महानगरपालिका उपायुक्त कैलास गावडे व मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांची मराठी भाषा संवर्धन आणि शहराच्या अनेक सामाजिक समस्या व इतर विविध विषयांबद्दल बैठकीत खालील विविध विषयावर कारवाई संदर्भात चर्चा करण्यात आली.अशी माहिती योगेश मोहन मराठी एकीकरण समिती नवीमुंबई,विठ्ठल नागणे मराठी एकीकरण समिती पनवेल यांनी तेज न्यूज ला दिली आहे.
१. दुकाने व आस्थापना, शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळ, गृहनिर्माण संस्था यांच्या पाट्या/ नामफलक नियमानुसार मराठी मध्ये नसल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करण्याची विनंती केली यावर बैठक घेऊन १५ दिवसात यावर पुढील निर्णय घेऊन कळविण्यात येईल असे उपआयुक्त यांनी आश्वासन दिले.
२. मॉल, चित्रपटगृह, दुकाने व आस्थापना (डिमार्ट, विजय सेल्स, क्रोमा... इत्यादी) ठिकाणी आग सुरक्षा (fire safety) व आपत्कालीन मार्ग (emergency exit) बद्दल माहिती व सुचना मराठीत नसल्याबद्दल कारवाईसाठी विनंती.
३. अनधिकृतपणे चौक व रस्ता/ मार्गाचे नामकरण होत असल्याचे निदर्शनास आणले व पुढील कारवाई करण्याची मागणी केली, तसेच चौक, रस्ता व मार्गाचे नामकरण करायचे असल्यास महाराष्ट्र राज्यातील, महाराष्ट्रासाठी योगदान असलेले संत, महात्मे, समाजसेवक, थोरपुरुष/महिला यांचीच नावे द्यावी अशी विनंती केली.
४. पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाडीवर वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा हिंदीत गाणी वाजत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि नियमानुसार फक्त मराठीत गाणी लावण्याची मागणी केली, ती मागणी मान्य करत तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.
५. पनवेल महापालिकेच्या प्रसाधन/शौचालय मध्ये मराठीत सुचना व माहिती नसुन हिंदीत व इंग्रजीत आहे हे निदर्शनास आणून दिले, एक भाषिक राज्याच्या भाषिक नियमानुसार प्रथम मराठी आणि दुसरी इंग्रजी भाषा वापर केला जावा अशी विनंती करण्यात आली.
६. राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे बऱ्याच खासगी शाळांमध्ये राज्यगीत वाजविले जात नाही. त्याबद्द्ल आदेश काढण्याच्या सुचना देण्यात आल्या.
७. शहरात विविध ठिकाणी वाहतूक सुचना फलक फक्त इंग्रजीत आहेत (उदा. Do not use mobile....) हे निदर्शनास आणले, व मराठी भाषेत करण्याची मागणी करण्यात आली.
८. पर्यावरण बद्दल सामाजिक सुचना फलक फक्त इंग्रजीत आहेत (उदा. Save The Planet, Plant a Tree, and Get Oxygen for Free....) हे निदर्शनास आणले, व मराठी भाषेत करण्याची मागणी करण्यात आली.
९. उदवाहन (Lift) मधील सुरक्षा व मदत बद्दलच्या सुचना (Do's & Don't's, Instructions for Help) मराठीत नसून फक्त इंग्रजीत आहेत हे निदर्शनास आणले, व सर्व महापालिका हद्दीत मराठी भाषेत सुचना लिहिण्यासाठी विनंती केली.
१०. उपहारगृह व चहाच्या टपरीवर कागदी कप (आतील बाजुस पातळ प्लास्टिक असलेले) चहा देण्यास तसेच वृत्तपत्राच्या कागदाचा वापर अन्नपदार्थ देण्यास विक्री करण्यास प्रतिबंध करण्यासाठी मागणी केली व ती जनतेच्या आरोग्यासाठी गरजेची असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
११. शहरातील वाढते पदपाथावरील अतिक्रमण आणि खुल्याने खाद्याचा स्टॉल लावत सिलिंडरचा वापर करून नागरिकांच्या जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करून पदपाथ नागरिकांसाठी खुले करून देण्याची विनंती करण्यात आली.
१२. पनवेल महानगरपालिका हद्दीत मुख्यतः स्थानक परिसरात वाहन पार्किंगची गंभीर समस्या असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंग केली जाते यावर मार्ग काढण्यासाठी विनंती करण्यात आली.
१३. नवीन पनवेल परिसरातील एकमेव राजीव गांधी खेळाचे मैदान यावर कोणतेही इतर अतिक्रमण न होता खेळाचे मैदान म्हणून आरक्षित रहावे याबाबत विनंती करण्यात आली.
१४. पालिकेचे समाजमाध्यम खाते ( फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर ) यांचा प्रभावीपणे वापर करत नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन ते सोडविण्यासाठी विनंती करण्यात आली.
१५. पनवेल जवळच लोकनेते दि. बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आलेले आहे आणि पनवेलची वाढती लोकसंख्या पाहता आणि शहरात मीटरप्रमाणे न धावणाऱ्या रिक्षांमुळे नागरिकांची प्रवासाच्या बाबतीत होत असलेली ओढाताण बघता पालिकेची स्वतःची परिवहन व्यवस्था लवकरात लवकर सुरू करण्याबाबत ठोस कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात आली.
१६. पनवेल महानगरपालिका हद्दीतील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार करून यावर उपाययोजना करण्याबाबत विनंती करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी सर्व गोष्टींमध्ये सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच वरील सर्व गोष्टींवर कारवाई करून बदल होतील असे आश्वासन देण्यात आले. यावेळी संघटनेचे मराठी एकीकरण समिती संघटनेचे सागर भणगे, प्रशांत काशिद, सुनील शिंदे, महादेव शिंदे, रमेश नाईक, शहरातील जागरूक नागरिक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सचिव आदित्य जानोरकर आणि इतर शिलेदार उपस्थित होते.


